पुणे Pune Drug Case : शहरात ललित पाटील ड्रग्ज प्रकरण घडलेलं असताना, पुणे शहरात पुन्हा एकदा हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. शहरातील फर्ग्युसन रोडवर असलेल्या 'एल 3 द लिझर लाउंज' या पबमधील एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले. या प्रकारात पुणे पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल करून 8 आरोपींना अटक केलीय.
आरोपींवर गुन्हा दाखल :पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी, संतोष विठ्ठल कामठे रा. ४४७/४, रंजनीगंध अपार्टमेंट शिवाजीनगर पुणे, सचिन विठ्ठल कामठे, उत्कर्ष कालीदास देशमाने, योगेंद्र गिरासे, रा. दवन सोसायटी, श्रीराम स्वीट मार्ट भुगाव मुळशी, रवि माहेश्वरी रा. उंड्री पुणे, अक्षय दत्तात्रय कामठे, रा. हडपसर माळवाडी पुणे, दिनेश मानकर, रा. नाना पेठ, रोहन राजू गायकवाड रा. भोसले पार्क हडपसर पुणे याला अटक केली आहे. तर एका आरोपीचा शोध सुरू आहे.
पबमधील एक व्हिडिओ आला समोर : याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील फर्ग्युसन रोडवर असलेल्या 'एल 3 द लिझर लाउंज' या पबमधील एक व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ शनिवारी मध्यरात्रीचा असून या ठिकाणी तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले, तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती. या प्रकरणात पुणे पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई करत, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने तसंच सहाय्यक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली आहे.