पिंपरी चिंचवड : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव कारच्या छतावर बसून स्टंटबाजी करणं दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतल आहे. तसंच, कारही जप्त केली आहे. त्यासोबतच कारवाईचा फोटो आणि स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून 'बक्षीस' दिलं असही म्हटलं आहे.
व्हिडिओ झाला व्हायरल : प्रतिक सुशिल शिंगटे (वय 24), ओमकार कृष्णा मुंढे (वय 20, दोघे रा. निगडी) अशी अटक केलेल्या तरुणांची नावं आहेत. दोघेही गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता चिंचवड येथील केएसबी चौकामध्ये भरधाव कार चालवत स्टंटबाजी करत होते. शिंगटे गाडी चालवत होता. तर, मुंढे छतावर बसून स्टंटबाजी करत होता. काहींनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर तो व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर, आम्ही त्यांना त्यांच्या साहसी खेळासाठी 'बक्षीस' दिलं असं लिहून एक सोशल मीडिया पोस्टदेखील केली.
बक्षीस नक्कीच मिळेल : स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना अटक केल्यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकाराची माहिती आपल्या एक्स अकाऊंटवर दिली आहे. स्टंटबाजीचा व्हिडीओ आणि कारवाईनंतरचे फोटो सोशल मिडियावर टाकले आहेत. त्या फोटोखाली 'बक्षीस' असं कॅप्शनदेखील पोलिसांनी लिहिले आहे. तसंच, आपण काहीही केलं तरी चालेल, कोणी काहीच करत नाही. काहीच होत नाही, असा विचार करू नका. तुमच्या स्टंटबाजचे बक्षीस नक्कीच मिळेल असा इशाराच पोलिसांनी दिला आहे.
- कडक कारवाई होणार : दोघांवर आयपीसी कलम 279, 336 आणि मोटार वाहन कायदा कलम 184, 119, 177 अंतर्गत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, वाहनदेखील जप्त करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी अशी स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी यावेळी दिला आहे.