ठाणे Clash In Thane Jail : कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील बंदिस्त दोन बंदीवानांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत एकानं दुसऱ्यावर धारदार ब्लेडनं सपासप वार केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आधारवाडी कारागृहातील बॅरेक नंबर पाचमध्ये घडली असून याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हल्लेखोर बंदीवानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज नवनाथ पवार उर्फ लोहार असं हल्लेखोर बंदीवानाचं नाव आहे. तर अरविंद उर्फ मारी रवींद्र राम असं ब्लेड हल्ल्यात जखमी झालेल्या बंदीवानाचं नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दोन बंदीवानात तुफान हाणामारी :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम भागातील आधारवाडी कारागृहात बॅरेक क्रमांक पाचच्या समोर दोन बंदीवानात तुफान हाणामारी झाली. यात हल्लेखोर युवराज नवनाथ पवार आणि दुसरा बंदीवान रोशन घोरपडे या दोघात वादावादी होऊन हाणामारी झाली. या वादामध्ये जखमी बंदीवान अरविंद उर्फ मारी रवींद्र राम यानं मध्यस्थी करुन घोरपडे आणि पवार यांच्यामधील वाद मिटवला. "हा वाद का मिटवला आणि तू मध्ये का पडला," असा प्रश्न युवराजनं अरविंदला केला. तो राग युवराजच्या मनात होता.