मुंबई Pravin Darekar on Sanjay Raut:शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सातत्याने सरसंघचालक मोहन भागवत त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. आजही त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाजपाचे पॉलिटिकल एजंट म्हणून संबोधलं आहे. यावरून आता भाजपा नेते आक्रमक झाले असून तेसुद्धा संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेत आहेत. भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
राहुल नार्वेकर भाजपाचे पॉलिटिकल एजंट :सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचा पीक व राज्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे सांगितल्यानंतरसुद्धा नार्वेकरांनी घटनाबाह्य पद्धतीनं खोटा निकाल दिला, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. या प्रकरणावर बोलताना दरेकर म्हणाले आहेत की, संजय राऊत बेताल वक्तव्य करत आहेत. संविधानाने ज्या काही यंत्रणा उभ्या केल्या आहेत, त्या विधानसभा अध्यक्षांवर अशा पद्धतीने बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर हक्कभंग आणला गेला पाहिजे; परंतु संजय राऊत यांना माहीत आहे अशा पद्धतीचं काही सणसणाटी बोललं की पब्लिसिटी भेटते आणि आपण चर्चेत राहतो. म्हणून ते दररोज अशा प्रकारे घटनेवर, देशावर, लोकशाही संदर्भामध्ये उलट सुलट वक्तव्य करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून संजय राऊत यांच्या वक्तव्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.