महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमित शाह यांची मोठी खेळी; विधानसभेच्या तोंडावर आवाडे पिता पुत्राचा भाजपामध्ये पक्षप्रवेश - Amit Shah Kolhapur Visit

Amit Shah Kolhapur Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी कोल्हापूरला भेट दिली. यावेळी त्यांनी कोल्हापूर विभागाचा आढावा घेतला. अमित शाह यांच्या उपस्थितीत आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांच्या पुत्रानं भाजपामध्ये प्रवेश केला.

Amit Shah Kolhapur Visit
आवाडे पिता पुत्राचा भाजपामध्ये पक्षप्रवेश (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2024, 7:14 AM IST

Updated : Sep 26, 2024, 8:01 AM IST

कोल्हापूर Amit Shah Kolhapur Visit :काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन 2019 ची निवडणूक अपक्ष लढवत इचलकरंजीमध्ये आमदार प्रकाश आवाडे यांनी विजयश्री खेचून आणली. यानंतर गेल्या पाच वर्षांपासून प्रकाश आवाडे भाजपाला पाठिंबा देऊन भाजपाचे मित्र पक्ष झाले. मात्र गेल्या दीड दोन वर्षात आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. वेळ आणि काळ जुळून येत नसल्यानं पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरत नव्हता. अखेर बुधवारी त्यांच्या या पक्षप्रवेशाला मुहूर्त लागला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला. विशेष म्हणजे या पक्षप्रवेशावेळी प्रकाश आवाडे यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार सुरेश हळवणकर हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Reporter)

आवाडे पिता पुत्रांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश : गेली पाच वर्ष इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे हे भाजपा प्रवेशाची वाट पाहत होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शाह कोल्हापुरात आले. त्यावेळी आवाडे पिता पुत्रांचा पक्षप्रवेश होणार असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र काही कारणास्तव हा पक्षप्रवेश होऊ शकला नाही. गेल्या पाच वर्षांपासून आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे भाजपाचे प्रामाणिक मित्र पक्ष म्हणून काम करत आहेत. मात्र त्यांचा पक्षप्रवेश होत नव्हता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र राहुल आवाडे लढणार असल्याचं काही दिवसांपूर्वी जाहीर केलं. मात्र यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी जर भाजपानं तिकीट दिलं तर भाजपामधून लढू अन्यथा स्वतःचा पक्ष असलेल्या ताराराणी पक्षातून लढणार असल्याचं सांगितलं. यामुळे महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली.

अमित शाह यांची मोठी खेळी; विधानसभेच्या तोंडावर आवाडे पिता पुत्राचा भाजपामध्ये पक्षप्रवेश (Reporter)

हळवणकर यांनी जपली भाजपाची संस्कृती : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतक आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच जिल्ह्यांचा कार्यकर्ता संवाद मेळावा कोल्हापुरात आयोजित करण्यात आला. याच कार्यकर्ता मेळाव्यात अखेर आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांचा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशानंतर प्रकाश आवाडे यांचे कट्टर विरोधक असलेले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर हे काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र सुरेश हळवणकर यांनी भाजपाची संस्कृती जपत पक्ष हितासाठी स्वतः आवाडे पिता-पुत्रांना व्यासपीठावर घेऊन जात त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला. यामुळे सुरेश हळवणकर यांचं कौतुक होत आहे.

महायुतीकडून राहुल आवाडेंना तिकीट मिळण्याची शक्यता : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात आवाडे पिता पुत्रांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्यानं महायुतीचं पारडं जड झालं आहे. यंदा महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल आवाडे यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. सध्या आवाडे पिता पुत्रांच्या पक्षप्रवेशामुळे सुरेश हळवणकर यांची गोची झाली असून जर राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळाली, तर येथील भाजपाचे माजी आमदार आणि यंदाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले सुरेश हळवणकर काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा :

  1. अमित शाह आज कोल्हापुरात; पाच जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक, विधानसभेचे फुंकणार रणशिंग - Amit Shah Visit Kolhapur
  2. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची 'मोठा भाऊ' होण्याची महत्त्वाकांक्षा, अमित शाह आज भाजपा पदाधिकाऱ्यांना मेळाव्यात करणार 'चार्ज' - Kolhapur assembly election
  3. 'शिंदे सरकार, मराठा सरदार'; संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॅनर्स, कोणी लावले हे बॅनर? - CM Eknath Shinde Banner
Last Updated : Sep 26, 2024, 8:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details