सातारा-पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीवरून रायगड, नाशिकनंतर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही राजकीय घमासान सुरू झालंय. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना साताऱ्याचं पालकमंत्रिपद न मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. रायगड, नाशिकप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती द्यावी, आंदोलनाची वेळ आणू नये, असा इशारा सातारा जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी दिलाय.
राजधानीचा सन्मान करा : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेत. त्यांना साताऱ्याचं पालकमंत्रिपद देऊन राजधानीचा सन्मान करावा, अशी मागणी कांचन साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केलीय. दिवंगत अभयसिंहराजे भोसले, विलासकाका उंडाळकर, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार यांनी आपल्या कामाचा राज्यात ठसा उमटवला. त्यांनी दबावतंत्राचा अन् पदाचा गैरवापर केला नव्हता. त्यांच्याच विचाराचा पालकमंत्री व्हावा, अशी आमची मागणी असल्याचं कांचन साळुंखे यांनी सांगितलंय.
सातारा जिल्ह्यावर शोककळा :सातारा जिल्ह्यात भाजपाचं वर्चस्व असूनही पालकमंत्रिपद न मिळाल्यानं शोककळा पसरलीय. पालकमंत्रिपदासाठी कोणते निकष लावले गेले हे स्पष्ट करण्याची मागणीही कांचन साळुंखे यांनी केलीय. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करून सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री बदलावा अन्यथा आम्हाला उपोषण करावं लागेल, असा इशाराही त्यांनी दिलाय.
शिवेंद्रराजेंचे समर्थक कांचन साळुंखे (Source- ETV Bharat) ...अन्यथा कमळ चिन्हावर लढणार नाही : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कमळ चिन्हावर लढणार नसल्याची भूमिका भाजपा श्रेष्ठींसमोर मांडणार आहोत. पालकमंत्री बदल होत नाही, तोपर्यंत उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही कांचन साळुंखे यांनी दिलाय.
हेही वाचा :
- मृतदेहावर जादूटोणा करण्याच्या बहाण्यानं महिलेला पावणे नऊ लाखांचा गंडा, पोलिसांकडून मांत्रिकाला अटक
- स्मशानातील भोंदू बाबाच्या जादूटोण्याचा डाव गावकऱ्यांनी उधळला; भोंदू बाबाला ठोकल्या पोलिसांनी बेड्या - Bhondu Baba Arrested