महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच; राजकीय चर्चांना उधाण - Future CM Controversy - FUTURE CM CONTROVERSY

Future CM Controversy : आज 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मंत्रालय परिसरात दोघांचेही "भावी मुख्यमंत्री" असा उल्लेख असणारे पोस्टर झळकले आहेत. त्यामुळं मुख्यमंत्रीपदावरून महायुतीतच रस्सीखेच सुरू आहे का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावर महायुतीतील नेत्यांनी काय म्हटलंय जाणून घेऊया.

Future CM Controversy
फाईल फोटो (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 6:44 PM IST

मुंबई Future CM Controversy:महाराष्ट्रात आगामी काळात म्हणजे पुढील तीन ते चार महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीला कसं सामोरं जायचं आणि आपले जास्तीत जास्त आमदार कसे निवडून आणायचे याबाबत महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. तर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तर नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त "भावी मुख्यमंत्री" अशी पोस्टरबाजी देखील केली जात आहे.

कार्यकर्त्यांची भावना :महायुतीमध्ये कोणतेही मतभेद किंवा वाद नाहीत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आणि अजित पवारांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त आणि त्याचे औचित्य साधून जर आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांना दोन्ही नेते मुख्यमंत्री व्हावे अशी जर त्यांची भावना असेल तर त्यात चुकीचं किंवा गैर काहीही नाही. शेवटी महायुतीत आपला पक्ष मोठा व्हावा, वाढावा हे नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही इच्छा असते आणि आज एवढा चांगला दिवस असताना त्यांना शुभेच्छा काय द्यायच्या? तर आमचा नेता ज्याला चौफेर अभ्यास आहे, व्यासंगी व्यक्तिमत्त्व आहे, त्यांच्यात महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे असे अजित पवार भावी मुख्यमंत्री व्हावे, असं कार्यकर्त्यांना वाटत आहे; म्हणून त्यांनी पोस्टरबाजी केलीय. त्याच्यात काही चुकीचं आहे, असं मला वाटत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हटलं आहे. दरम्यान, महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे, अशी टीका करण्याचा पूर्ण अधिकार विरोधकांना आहे. शेवटी महाविकास आघाडीत काही कमी वाद आहेत का, त्यांच्यातसुद्धा मतभेद आहेत. त्यांच्यात तिन्ही पक्षातील नेते मुख्यमंत्री हा आपलाच पक्षाचा असावा, असा दावा करण्यात येत आहे; परंतु महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

आम्हाला मार्ग मोकळा आहे :महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. महायुतीतील पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे की, आपल्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा. नेतेही कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असेल, असं बोलत आहेत. महायुतीत तो प्रत्येकाला अधिकार आहे; परंतु शेवटी ज्या पक्षाचे अधिक आमदार येथील त्यांचाच मुख्यमंत्री होईल, असं रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हटलं आहे; मात्र महायुतीत मुख्यमंत्री पदावरून जी पोस्टरबाजी आणि जी रस्सीखेच सुरू आहे, त्याच्यामध्ये मित्र पक्ष किंवा घटक पक्षांची गोची होते किंवा त्यांना महायुतीत राहणं अपरिहार्य आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. कारण शेवटी जागावाटपामध्ये आम्हाला जर समाधानकारक जागा मिळाल्या नाहीतर, आम्ही वेगळा निर्णय घेऊ शकतो. आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे, स्वबळावर निवडणूक लढवून दहा-पंधरा आमदारसुद्धा आम्ही जिंकून आणू शकतो, असा विश्वासदेखील रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.

महायुतीत भाजपाच मोठा पक्ष :आमचे नेते अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट सांगितलं आहे की, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका ह्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील; परंतु महायुतीमध्ये भाजपा हा पक्षच मोठा आहे आणि राज्यात पुन्हा एकदा भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीचेच सरकार येईल. हे अमित शाहंनी पुन्हा एकदा काल स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचा होणार? किंवा कोण होणार? यापेक्षा महायुतीचे सरकार येणार हे महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली आहे.

हेही वाचा :

  1. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं अटक करा; 'ठोकून काढा' वक्तव्यावर संजय राऊतांचा हल्लाबोल - Raut Demand Arrest To Fadnavis
  2. "शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार, त्यांचं सरकार येताच आरक्षण..."; पुण्यातून अमित शाहांचं शरसंधान - Amit Shah on Sharad Pawar
  3. अमित शाहांची शरद पवारांवर टीका, सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “हे ऐकून मला हसू…” - Supriya Sule

ABOUT THE AUTHOR

...view details