महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या दाढीवरुन राजकारण तापलं; चक्क रावणाचीही दाढी काढली - CM Eknath Shinde beard

CM Eknath Shinde Beard : पुरुषाला दाढी असेल तरच तो रुबाबदार दिसतो असं बोललं जातं. मागील काही वर्षांपासून दाढीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढतोय. सेलिब्रिटींपासून ते अगदी राजकारण्यांपर्यंत दाढी वाढवण्याची क्रेज दिसून येते. आता याच दाढीवरुन राजकारण तापलंय. वाचा, काय आहे नेमकी भानगड....

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 9:12 AM IST

शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे

मुंबई CM Eknath Shinde Beard : मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीची जोरदार चर्चा सुरूय. या दाढीनं काडी फिरवली तर तुमची राहिलेली लंका जळेल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाला लगावला होता. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यानंतर आता शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी जोरदार पलटवार केलाय.

काय म्हणाले होते संजय राऊत? : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दाढीवरुन खोचक टीका केली होती. "रावणाला दाढी होती आणि लंकाही त्यांची होती. तुम्ही ज्या लंकेमध्ये गेला आहात ती लंकाच आम्ही जाळून टाकतो आहोत", अशी टीका संजय राऊतांनी शिंदेंवर केली होती. त्यावर शिवसेनेकडून राऊतांवर पलटवार करण्यात आलाय.

तुम्हाला काय कळणार दाढीवाल्यांचा स्वॅग : शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी संजय राऊतांवर चांगलाच पलटवार केलाय. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, शहाजीराजे, महात्मा फुले, गुरुगोविंद सिंग, गुरुनानक, नवनाथांनाही दाढी होती. तुम्हाला काय कळणार दाढीवाल्यांचा स्वॅग आणि एकनाथ शिंदे आहेत महाराष्ट्राचा वाघ, असं म्हणत वाघमारे यांनी राऊतांना टोला लगावलाय.

अहंकाराची माडी उध्वस्त करणार : तुम्ही काडी लावत जा, आम्ही विकासाची हिरवीगार झाडी लावत जाऊ, तुम्ही जाळण्याची भाषा करा आणि आम्ही महाराष्ट्राला सांभाळण्याची भाषा करू. इथून पुढे जर दाढीवर बोललात तर शिवसैनिक तुमच्या अहंकाराची माडी उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत, असंही ज्योती वाघमारे यावेळी म्हणाल्या. दाढी ही शिवरायांच्या मावळ्यांना शोभते तुमच्यासारख्या कावळ्यांना नाही, असा पलटवारही त्यांनी केलाय.

तुमची दाढीच आम्ही जाळणार : कोणाचं काय जळत आहे हे लवकरच कळेल. आम्ही सर्व हनुमान आहोत, तुमची जी लंका आहे ती दिल्लीत आहे. तुमची दाढी दिल्लीवाल्यांच्या हातात आहे. ते कधीही दाढी काढू शकतात. तुम्हाला तिकडे बोलावू शकतात. लंका ही रावणाची जळाली, त्यांना माहिती नाही. रामाला दाढी नव्हती, दाढी रावणाला होती. त्यांना रामायण आणि महाभारत वाचावं लागेल. मुळात दिल्लीची लंका जळत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या लंकेत गेला आहात ती लंकाच आम्ही जाळणार आहोत. तर, तुमचं काय होणार? दाढी-बिडीची गोष्टी आम्हाला सांगू नका, अशी टीका राऊतांनी केली होती.

हेही वाचा :

1अशोकराव चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर विजय वडेट्टीवारांसह काय म्हणाले काँग्रेसचे आमदार?

2भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही- पृथ्वीराज चव्हाण

3आजोबांना भारतरत्न मिळताच नातवाचा भाजपाप्रणीत एनडीएत प्रवेश; 'इंडिया' आघाडीला आणखी एक धक्का

ABOUT THE AUTHOR

...view details