वर्धा PM Narendra Modi Wardha Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज (19 एप्रिल) वर्ध्यात जाहीर सभा पार पडली. महायुतीचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मोदींची आज सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलत असताना पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी? : यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "वर्धा ही संतांची भूमी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, लालूजी महाराज, संत मायबाई, आडकूजी महाराज असे अनेक किती अगणित महान संतांचे आशीर्वाद या भूमीत मिळतात. 2024 ची लोकसभा निवडणूक ही आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीची आहे, विकसित भारताची मुहूर्तमेढ रोवणारी ही निवडणूक आहे, यात वर्धा व अमरावती लोकसभेतील लोकांचा आम्हाला आशीर्वादाची गरज आहे", असं प्रतिपादन मोदींनी केले.
25 टक्के लोकांना गरीबीतून बाहेर काढलं : पुढं ते म्हणाले की, 2014 च्या अगोदर देशातील लोकांना असं वाटत होतं की, देशाचा विकास होऊच शकत नाही. शेतकऱ्यांना असं वाटायचं की, त्यांच्या मालाला किंमत मिळणार नाही. पण ज्यांना कोणीही विचारलं नाही, त्यांचं गरीबाच्या या मुलानं पूजन केलं. आम्ही 25 टक्के लोकांना गरीबीतून बाहेर काढलंय, गावोगावी वीज पुरवठा केला, 11 कोटी लोकांना पाणी पुरवठा केला, 4 कोटी लोकांना पीएम आवास योजना मिळाली, असंही मोदींनी सांगितलं.
कॉंग्रेससह इंडिया आघाडीवर टीका :पुढं काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका करत ते म्हणाले, काँग्रेस आणि इंडिया आघाडीची विचारसरणी देशविरोधी आणि शेतकरीविरोधी आहे, त्यामुळंच देशातील शेतकऱ्यांची अवस्था अनेक दशकांपासून वाईट होती. काँग्रेस आघाडीच्या कामकाजासाठी मराठीत एक म्हण आहे, 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'. इंडिया आघाडीच्या लोकांना मतदान करणे म्हणजे मत बर्बाद करणं आहे. मात्र, महाराष्ट्रातील लोकांनी आणि देशातील जनतेनं ठरवलंय की, विकासाला मतदान करायचं. तसंच देशातील सर्व विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी फिर एक बार चारसो पार असा नारा यावेळी नरेंद्र मोदी यांनी दिला.
हेही वाचा -
- औरंगजेब आणि मोदी दोघेही एकाच मातीतले; खासदार संजय राऊत यांची टीका - Lok Sabha Election 2024
- मोदींची हवा, कुठे नरम, कुठे गरम; विरोधकांनी दिली खरमरीत प्रतिक्रिया तर महायुतीला दिसतोय मोदींचा करिश्मा - Lok Sabha Election 2024
- "अभी तो ट्रेलर है"म्हणत पंतप्रधान मोदींचा विरोधकांना इशारा; 'ईडी'चं केलं कौतुक - PM Narendra Modi on ED