मुंबई Human Finger Inside an Ice Cream : काही दिवसांपूर्वी मालाडमधील डॉक्टर ब्रेंडन ऍटिक्स फेरॉव (वय २६) यांनी ऑनलाईन मागवलेल्या बटरस्कॉच आईस्क्रीमच्या कोनमध्ये सापडलेला मानवी बोटाचा तुकडा हा पुण्यातील आईस्क्रीम बनविणाऱ्या कारखान्यात कार्यरत असलेल्या असिस्टंट ऑपरेटर मॅनेजर (Assistant Operator Manager) ओंकार पोटे (वय २४) यांच असल्याचं डीएनए (DNA) अहवालात स्पष्ट झाल्याची माहिती, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे.
ओंकार पोटे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार : आईस्क्रीममध्ये बोटाचा तुकडा हा पुण्यातील फॉर्च्युन कंपनीत कार्यरत असलेल्या असिस्टंट ऑपरेटर मॅनेजर ओंकार पोटे याचं असल्याचं डीएनए अहवालात स्पष्ट झाल्यामुळं ओंकार पोटे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
तपासणीसाठी डीएनए सॅम्पल : 11 मे 2024 रोजी आईस्क्रीम पॅकिंग करताना ओंकार पोटे यांच्या उजव्या हाताच्या बोटाचा काही भाग कापला गेला होता. त्यावेळी तो बोटाचा तुकडा आईस्क्रीममध्ये पॅकिंगदरम्यान गेला होता. या खुलाशानंतर मुंबई पोलिसांनी फॉर्च्युन कंपनीविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीतील याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. अलीकडेच पुण्यातील फॉर्च्युन कंपनीच्या कारखान्यात काम करताना अपघात होऊन कामगाराने उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा तुकडा पडल्याचे प्राथमिक पोलीस चौकशीत समोर आलं होतं. पोलिसांनी या कामगाराचे आणि बोटाच्या तुकड्याचे डीएनए सॅम्पल तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले होते.