महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"उद्धव ठाकरेंपेक्षा शिंदेंनी चांगलं काम केल्याचं पवारांना मान्य म्हणून..." चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांवर हल्लाबोल - CHANDARSHEKHAR BAWANKULE ON RAUT

शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना पुरस्कार देण्यात आलाय. यावर खासदार संजय राऊतांनी टीका केली होती. याचाही चंद्रशेखर बावनकुळेंनी खरपूस समाचार घेतलाय.

BJP State President and Revenue Minister Chandrashekhar Bawankule
भाजपा प्रदेशाध्यक्ष अन् महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2025, 1:59 PM IST

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीने सदस्य अभियान नोंदणी सुरू केली होती, याला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात भाजपाने सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात केलीय. 1 कोटी नवीन सदस्य नोंदणी भाजपाने केलीय. 42 हजार शहरी भागात नोंदणी झालेय तर 55 हजार ग्रामीण भागात नोंदणी झालीय, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, यावेळी त्यांनी शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना पुरस्कार देण्यात आलाय. यावर खासदार संजय राऊतांनी टीका केली होती. याचाही चंद्रशेखर बावनकुळेंनी खरपूस समाचार घेतलाय.

ठाकरेंनी शिंदेंकडून शिकले पाहिजे : शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना पुरस्कार देणे म्हणजे महाराष्ट्राचे शत्रू अमित शाहांचा गौरव करण्यासारखा आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत यांना महाराष्ट्राची संस्कृती समजली नाही. शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार करणे किंवा त्यांच्या हस्ते पुरस्कारे देणे... एखाद्या पुरस्कारासाठी शिंदेंची निवड करणे ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे. यापूर्वी मला वाटलं होतं की, शरद पवार हे संजय राऊत यांना सल्ला देत होते, असा आमचा समज होता. पण आता संजय राऊत हे शरद पवारांना सल्ला द्यायला लागले आहेत का? महाराष्ट्राची संस्कार आणि संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलंय. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदेंनी चांगले काम केले हे शरद पवारांनी मान्य केलंय, म्हणून पवारांच्या हस्ते शिंदेंना पुरस्कार देण्यात आलाय. शिंदेंनी 18-18 तास काम केलंय. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ दोनवेळा मंत्रालयात आले. राज्याची वाट लावण्याचं काम ठाकरेंनी केलं. तर शिंदेंनी राज्याला पुढे नेण्याचे काम केलं. यातून उद्धव ठाकरे यांनी शिकले पाहिजे, असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

संजय राऊत पिसाळलेत :संजय राऊत रोज उठून काहीही बोलत आहेत. त्यांना एवढं गांभार्याने घेऊ नका. त्यांच्याशी जे चांगले त्यांना ते चांगले बोलणार, अन्यथा त्यांना वाईट बोलणार ही त्यांची सवय आहे. सत्ता गेल्यामुळं संजय राऊत पिसाळलेले आहेत, म्हणून काहीही बोलत आहेत, अशी घणाघाती टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊतांवर केलीय. दरम्यान, जो पक्ष काँग्रेससोबत जाणार आहे. तो पक्षदेखील संपणार आहे. लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला. पण आम्ही त्यातून शिकलो. अभ्यास केला आणि कुठे कमी पडतोय तिथे काम केले. मात्र मविआ गाफिल राहिली. विजयाच्या उन्मादात राहिली. मुख्यमंत्री कोणाचा यात दंग राहिले. विधानसभा निवडणुकीत मविआने 90-90-90 असा जागांचा फॉर्म्युला केला म्हणून त्यांचा पराभव झाला. त्यावेळी ते कुठल्या 90-90-90 नशेत होते. माहिती नाही, असं बावनकुळेंनी म्हणताच एकच हशा पिकला.

देशातील सर्वांत मोठा पक्ष भाजपा : मागील काही दिवसांपासून सर्वत्र भाजपा सदस्य नोंदणी झालीय. महाराष्ट्रात दीड कोटी भाजपा सदस्य नोंदणी झाली आहे. हा एक राज्यात विक्रम झालाय. देशासह राज्यातही सदस्य नोंदणीत भाजपा पक्षाने विक्रमी संख्या गाठली आहे. दरम्यान, आगामी काळात सर्वांना ऍक्टिव्ह मेम्बरशिप घावी लागणार आहे. तसेच 1000 मंडळ तयार करणार आहोत. मार्चपर्यंत भाजपाचे अतिशय मजबूत संघटन तयार होईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details