महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नितीन गडकरींच्या विभागानं बांधला पूल; उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी कोसळला स्लॅबचा तुकडा, भाजपा नेत्याचा पुत्र बालंबाल बचावला - PARDI FLYOVER NAGPUR

नागपूरमध्ये अनेक वर्षे संथगतीनं काम सुरू असलेल्या आणि टप्प्याटप्प्यानं उद्घाटन होत असलेल्या पारडी उड्डाणपुलाचा एक सिमेंटचा तुकडा चालत्या कारवर पडल्यानं खळबळ उडाली आहे.

pardi flyover slab concrete collapses on car next day of inauguration in nagpur
पारडी उड्डाणपुलाच्या स्लॅबचा तुकडा कारवर कोसळला (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2025, 11:05 AM IST

नागपूर :गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला पूर्व नागपुरातील पारडी इथला उड्डाणपूल गुरुवारी (20 फेब्रुवारी) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी (21 फेब्रुवारी) या पुलाचं प्लास्टर खचून, सिमेंट काँक्रीटचा एका मोठा तुकडा खालून जाणाऱ्या कारवर कोसळला. यात कारच्या समोरील काचेचा चेंदामेंदा झाला. दरम्यान, या घटनेमुळं पारडी उड्डाणपुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सुदैवानं दुखापत टळली : भारतीय जनता पक्षाचे पश्चिम नागपूर इथले जेष्ठ पदाधिकारी नवनीत श्रीवास्तव यांचे पुत्र विशेष श्रीवास्तव शुक्रवारी वर्धमान नगर ते जुना पारडीनाका मार्गे कारनं जात होते. वाटेत उड्डाण पुलाचं प्लास्टर खचून, सिमेंट काँक्रीटचा मोठा तुकडा कारच्या समोरील भागावर कोसळला. या घटनेत गाडीचा समोरील भाग चपकून, काचेचा चक्काचूर झाला. सुदैवानं यात कारचालकास दुखापत झाली नाही. तर या घटनेनंतर काहीकाळ परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी : शहरात सर्वत्र उड्डाणपुलाची कामं सुरू आहेत. पण, त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप सर्वसामान्यांतून होत आहे. त्यामुळं या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील बुटीबोरी उड्डाणपूलही दीड महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे खचला होता. त्या पुलाची अद्याप दुरुस्ती झालेली नाही.

भूमिपूजनाला साडेनऊ वर्षे : पारडी उड्डाणपुलाचं बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच्या भूमिपूजनाला सुमारे साडेनऊ वर्षे झालीत. बांधकाम सुरू होऊन साडेसात वर्षे पूर्ण झाले. पारडी उड्डाणपुलाचं काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत एनएचएआयनं वारंवार पुढं ढकलली होती. या उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका २०२३ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु, एचबी टाऊन, सेंट्रल एव्हेन्यूकडील मार्गिका आणि अंतर्गंत रिंग रोडकडील मार्गिकेचं काम अपूर्ण होतं. अखेर ते काम पूर्ण झालं आणि ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. परंतु, उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी पुलाचं प्लास्टर खचल्यानं खळबळ उडाली.

शहरात आखणी पाच उड्डाणपूल : नागपुरात ‘महारेल’ कंपनी पाच उड्डाणपूल उभारत आहे. रेशीमबाग ते के.डी.के. कॉलेज, टेलिफोन एक्सचेंज चौक ते भांडेप्लॉट (२५१ कोटी), चंद्रशेखर आझाद चौक ते मारवाडी चौक (६६कोटी), लकडगंज पोलीस ठाणे ते वर्धमाननगर (१३५ कोटी), नंदनवन, राजेंद्रनगर चौक ते हसनबाग चौक (६६ कोटी) आणि वर्धमाननगर ते निर्मलनगरी उमरेड रोड (२७४कोटी) या उड्डाणपुलांचा यात समावेश आहे.

हेही वाचा -

  1. नागपुरात देशातील पहिला 'चार मजली उड्डाणपूल' सुरू; गडकरी म्हणाले, "वरदान ठरणार" - Nagpur Double Decker Flyover Bridge
  2. बर्फीवाला उड्डाणपुलासह गोखले पूल वाहतुकीसाठी खुला; 'या' वाहनांच्या वाहतुकीला आहे मनाई - Gokhale and Barfiwala Bridge Open
  3. बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोखले पुलाची जोडणी यशस्वी, 'या' तारखेपासून होणार वाहतूक सुरू - Barfiwala Flyover

ABOUT THE AUTHOR

...view details