अमरावतीPandava Kacheri: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर माडू नदीच्या पलीकडे एक अनोखं ठिकाण आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातलं हे ठिकाण पांडव कचेरी म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणाबाबत विविध पौराणिक आणि पारंपारिक कथा सांगितल्या जातात.
अशी आहे पांडव कचेरी - पांडव कचेरीची इमारत ही उत्तर दक्षिण दिशेत आयातआकृती समान आहे. पूर्णतः दगडाचा ओटा असणाऱ्या या ठिकाणी एकूण 32 खांबांवर लाल दगडांची ही इमारत उभी आहे. या इमारतीचे प्रवेशद्वार उत्तरमुखी असून या दगडी प्रवेशद्वाराची चौकट लाकडावर कोरीव काम केल्याप्रमाणे अत्यंत सुबक पद्धतीनं तयार करण्यात आलीय. या इमारतीच्या आतमध्ये एका भागात देवळाच्या गाभाऱ्यासारखा परिसर आहे. सध्या या ठिकाणी दोन मूर्ती आहेत. मात्र त्या नेमक्या कोणत्या देवाच्या हे सांगता येत नाही. या ठिकाणी पूर्वी असणारी महादेवाची पिंड असणारं स्थळ पूर्णतः भग्नावस्थेत आहे. इमारतीच्या समोरच्या भागातून सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहावी यासाठी सहा मोठ्या खिडक्या आहेत. यासोबतच इमारतीच्या मागच्या बाजूच्या भिंतीवर अगदी छोट्या आकाराच्या चौकोनी खिडक्या आहेत. इमारतीच्या आत दगडांचे चार बाक दिसतात. या बाकांवर पूर्वी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था असावी असा अंदाज येतो. या इमारतीला असणाऱ्या 32 ही खांबांवर नक्षीकाम केलं असून नक्षीकामातील मूर्ती मात्र नेमक्या कुणाच्या आहेत हे लक्षात येत नाही. काही दगडांवर मात्र स्त्री पुरुष कामक्रीडा करीत असल्याची कलाकुसर केलेली आढळते. उत्तर मुखी देवाचा गाभारा असणाऱ्या दालनाचं दार मात्र अतिशय सुंदर नक्षीकाम करून सजवलं आहे. गाभाऱ्याचा उंबरठा देखील नजरेत भरणारा आहे. विशेष म्हणजे मंदिराप्रमाणे या इमारतीवर कळस नाही. ही इमारत म्हणजे पूर्वी सभागृह असावं असा अंदाज येतो.
दगडी परकोटानं वेढला परिसर -उंच भागावर असणाऱ्या पांडव कचेरीचा परिसर दगडी परकोटानं वेढला आहे. हा परिसर उंच भागावर असल्यामुळं या ठिकाणी अशी भव्य वास्तू असेल असा अंदाज या भागात येणाऱ्या नवख्या व्यक्तीला येत नाही. झुडपामध्ये या परकोटच्या दिशेनं जाणाऱ्या पायऱ्या आढळतात. या पायऱ्यांवरून गेल्यावर परकोटाच्या आत भव्य इमारत नजरेत भरते. चारही बाजूनं हा दगडी परकोट बांधला असून या परकटाचं वैशिष्ट्य म्हणजे ओबडधोबड स्वरूपात तो बांधला असून त्यावरून एखादा ट्रक जाईल इतकी मोठी त्याची रुंदी आहे. चारहीबाजूंनी दूरपर्यंत बांधण्यात आलेल्या या परकोटाच्या आतमध्ये काही ठिकाणी भग्नावस्थेत असणाऱ्या मूर्ती आढळतात. नागाचा फणा किंवा एखाद्या सिंहासनाचा मागचा भाग भासणारी दगडाची अनोखी कलाकृती या इमारतीच्या मागच्या बाजूला आहे. या कलाकृतीला भगवा रंग देण्यात आला असून या भागातील आदिवासी बांधव त्याची पूजा करत असावेत असा अंदाज येतो. एकूणच परकोटाच्या आत हे ठिकाण कधीकाळी किती भव्य असावं अशी प्रचिती येते.