पालघर-पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानं आमदार श्रीनिवास वनगा प्रचंड नाराज झाले असून नैराश्यात गेले आहेत. सातत्यानं आक्रोश करणारे वनगा अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले असून त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतित आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार वनगा यांच्या पत्नीशी संपर्क साधून माहिती घेतली. तर आमदार वनगा हे निष्क्रिय असल्यामुळेच पक्षानं त्यांना उमेदवारी नाकारली असे स्पष्टीकरण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी केले.
गेल्या दोन दिवसांपासून पालघर विधानसभा मतदारसंघातील राजकीय नाट्य चांगलेच रंगलं आहे. भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत आलेल्या माजी खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेनं पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. आमदार वनगा यांचे अन्यत्र राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द त्यांना देण्यात येत होता. परंतु यापूर्वी झालेल्या फसवणुकीमुळे ते आता कशावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. उलट गेल्या दोन दिवसांपासून ते कुणाशीही बोलत नव्हते.
मुख्यमंत्र्यांचा मतपरिवर्तनाचा प्रयत्न-आमदार श्रीनिवास वनगा यांना सोमवारी दुपारी माध्यमांशी बोलताना रडू कोसळले. त्याचवेळी त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार वनगा नैराश्यात गेले असून ते आत्महत्या करण्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर काही तासातच वनगा कुठेतरी निघून गेले. त्यांचा फोनही ‘स्विच ऑफ’ आहे. त्यांच्याशी कुटुंबीयांचा आणि अन्य कुणाचाही संपर्क होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु वनगा ‘नॉट रिचेबल’ असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वनगा यांच्या पत्नीशी संपर्क साधून त्यांना धीर दिला.
संखे म्हणतात, ‘वनगा जनतेलाच नकोसे!’दुसरीकडे शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी आमदार वनगा यांच्यावर निष्क्रियतेचे आरोप केले आहेत. ते म्हणाले, "गेल्या पाच वर्षात मतदारसंघात कोणतेही काम नाही. त्यांच्याबाबत जनतेतून नाराजी व्यक्त होत होती. त्यांना उमेदवारी दिली असती, तर ही जागा पक्षाच्या हातून गेली असती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनीच उमेदवार बदलण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिला. मुख्यमंत्र्यांनी तो मान्य केला. आमदारकी, खासदारकी ही काही कोणाची जहागिरी नाही. कुणाच्या सातबारावर ही पदे नसतात," असे ते म्हणाले.