मुंबई : LOK SABHA ELECTION 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने मुंबई उत्तर पूर्व मधून विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट केला असून त्यांच्या जागी आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी घोषित केली आहे. तर, मुंबई उत्तर मधून गोपाल शेट्टी यांचाही पत्ता कट केला असून त्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर मध्य मुंबई मधून पूनम महाजन यांच्या जागेवर दुसऱ्या उमेदवाराची चर्चा भाजपाकडून सुरू आहे. (mumbai lok sabha) जर तसं झाल्यास यंदा भाजपा मुंबईतील आपल्या तिन्ही विद्यमान खासदारांना घरी बसवणार आहे. दुसरीकडे उत्तर पश्चिम मतदारसंघातून एकनाथ शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचाही पत्ता कट झाल्यात जमा आहे. उबाठा गटातून या जागेवर एकनाथ शिंदे यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली असल्याकारणाने त्या विरोधामध्ये गजानन कीर्तिकर निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे गट या मतदारसंघातून उमेदवाराच्या शोधात आहे.
वायकर यांचा निवडणूक लढवण्यास नकार : माजी खासदार, चित्रपट अभिनेता गोविंदा आहुजा यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. उत्तर पश्चिम मतदार संघातून गोविंदा यांना उमेदवारी दिली जाणार अशी शक्यता होती. परंतु, शिंदे गटातीलच काही नेत्यांनी त्यास विरोध केल्याने गोविंदाचे नाव मागे पडलं आहे. शिवाय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गोविंदा दोघांनीही गोविंदा यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. आता या जागेवर उबाठा गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले आमदार रवींद्र वायकर यांच्याही नावाची चर्चा होती. परंतु, वायकर यांनीही निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. वायकर निवडणूक लढवणार असतील तर प्रचारावर बहिष्कार घालण्याची भाषा स्थानिक भाजपा नेत्यांनी केली होती. अशा परिस्थितीमध्ये मराठी तसंच उत्तर भारतीय मतदारांचा टक्काही जास्त असलेल्या या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यावी हा पेच एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे.
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघावरून काँग्रेस नाराज: मुंबई दक्षिण या मतदार संघात उबाठा गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी सतत दोनदा बाजी मारली असून यंदा ते हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. महायुतीत ही जागा एकनाथ शिंदे गटाकडे असली तरी या जागेवर अद्याप त्यांना उमेदवार सापडत नाही. तसंच, मनसे महायुतीत सामील झाल्यास या जागेवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं जाण्याची शक्यता आहे. परंतु, महायुतीबरोबर मनसेचे सूर जुळत नसल्याने या मतदारसंघांमध्येही अद्याप उमेदवाराबाबत संभ्रम आहे. उत्तर पूर्व मुंबई (ईशान्य) या मतदारसंघात उबाठा गटाकडून संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपाने येथे आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात थेट उबाठा विरुद्ध भाजपा अशी रंगतदार लढत होणार आहे.
खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून उद्धव ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस नाराज आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात एकनाथ शिंदे गटाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अनुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम असे विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. यापैकी अनुशक्ती नगरमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक, चेंबूर मध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश फातर्पेकर, माहीममध्ये शिंदे गटाचे सदा सरवणकर, वडाळा मतदारसंघात भाजपचे कालिदास कोळंबकर, सायन कोळीवाडा मतदार संघात भाजपचे तमिळ सेलवन, तर धारावी मध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विद्यमान आमदार आहेत.
अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा : विशेष म्हणजे या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व राहिलं असलं तरी सुद्धा काँग्रेसचाही प्रभाव या मतदार संघावर आहे. या मतदारसंघात दादर, माहीम, प्रभादेवी, शिवसेना भवन परिसर येथील मराठी मतदारांचा समावेश असून, अनेक वर्ष शिवसेनेचे वर्चस्व या विभागातून राहिलं आहे. या मतदारसंघातील धारावी या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विद्यमान आमदार असून काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठवण्यात आलेले चंद्रकांत हांडोरे हे सुद्धा याच लोकसभा मतदारसंघातून येतात. आशियातील सर्वात मोठी म्हणून ओळखली जाणारी झोपडपट्टी धारावी याच मतदारसंघात आहे. यापूर्वी या मतदारसंघातून काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांनी शिवसेनेचे मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. या कारणाने या मतदार संघाचा इतिहास पाहता काँग्रेसने येथे प्रखर दावेदारी केली असताना, उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा करून महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचं काम केलं आहे.