मुंबई - जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे. तसतसं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना पोलिसांच्या दबावाखाली तडीपारीच्या नोटिसा येऊ लागल्या आहेत. यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर तोफ डागलीय. राज्यात निवडणुका पारदर्शकपणे पार पाडायच्या असतील तर केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवावं, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केलीय. मुंबईत ते बोलत होते.
फडणवीस यांनी पुन्हा पदावर घेतलं :याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांवर मक्को, तडीपारीच्या नोटीस लावून निवडणूक आपल्या ताब्यात घ्यायची, असा प्रयत्न राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून होत आहे. आजही आमचे फोन टॅपिंग होत आहेत. आमचे जे प्रमुख लोक आहेत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार केलं जातंय, अशा पद्धतीचा दबाव रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. रश्मी शुक्ला यांना का हटवलं जात नाही? त्यांची नेमणूकच बेकायदेशीर आहे. निवडणूक आयोगाला आम्ही वारंवार सांगत आहोत की, तुम्हाला पारदर्शकपणे निवडणुका करायच्या असतील, तर तुम्हाला रश्मी शुक्ला यांना हटवावेच लागेल. ज्यांच्यावर आरोप होते त्यांनाच पुन्हा फडणवीस आल्यावर पदावर घेतलं, असा आरोपसुद्धा संजय राऊत यांनी केलाय.
दीपोत्सवाच्या निमित्ताने राजकीय प्रचार :राज ठाकरे यांच्या मनसेने शिवाजी पार्कवर केलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमावरून आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आतापर्यंत असे कार्यक्रम हा एक सोहळा असायचा. तेव्हा निवडणुका व्हायचा नाहीत. आता निवडणुका जाहीर झाल्यात. अशा वातावरणात दीपोत्सवाच्या निमित्ताने राजकीय प्रचार होत असून, आचारसंहितेचा भंग होणार असेल आणि त्यावर कोणी आक्षेप घेतला असेल तर तो चुकीचा नाही. निवडणूक आयोग याची योग्य ती दखल घेईल, असंही संजय राऊत म्हणालेत.
गद्दारांच्या माथी माती:माहीममध्ये अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांच्या उमेदवारीवरून वाद अद्याप सुरू आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, माहीमचा विषय हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. ज्या पक्षाकडून शिवसेनेची मतं कापली जातील त्यांना मदत करायची हे भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय धोरण आहे. गद्दारांच्या माथी अनेक ठिकाणी माती खायची वेळ आलेली आहे, असं सदा सरवणकर यांचे नाव न घेता संजय राऊत यांनी त्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय.
आमचे फोन आजही टॅपिंग केले जातात, संजय राऊतांचा गंभीर आरोप
आजही आमचे फोन टॅपिंग होताहेत. आमचे जे प्रमुख लोक आहेत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार केलं जातंय, असा दबाव रश्मी शुक्ला यांच्यावर आहे.
संजय राऊत (ETV Bharat File Photo)
Published : 5 hours ago