नाशिक Swine Flu Patient In Nashik : नाशिकमध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलंय. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दातली गावातील एका महिलेचा स्वाईन फ्लूमुळं मृत्यू झाला असून शहरातील दोघांना स्वाईन फ्लूची लागण झालीय. यामुळं पुन्हा एकदा मनपा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. महापालिकेकडून स्वाईन फ्लू संशयित रुग्णांचा शोध घेतला जातोय. सर्दी, खोकला, तापाची लक्षणं असल्यास तातडीनं रुग्णालयात उपचार घेण्याचं आवाहन महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ तानाजी चव्हाण यांनी केलंय.
एका महिलेचा मृत्यू : एकीकडं नाशिकमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढं गेलाय. अशा तापमानात नाशिकमध्ये स्वाईन फ्लूनं शिरकाव केला असून दोन रुग्ण हे स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात एका महिलेचा आणि पुरुषाचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांचा अहवाल पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडं तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झालाय. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. सिन्नर तालुक्यातील दातली येथील 63 वर्षीय महिलेचा शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आलाय.