मुंबईBJP Foundation Day:आज (6 एप्रिल) भाजपाचा स्थापना दिवस आहे. 1980 मध्ये 6 एप्रिल रोजी भाजपाची स्थापना झाली. त्या लावलेल्या एका रोपट्याचे काही वर्षांनी एवढं मोठं झाड होईल असं क्वचितच कुणाला वाटलं होतं. आज परिस्थिती अशी आहे की, 2024 च्या आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा 370 जागांवर आणि एनडीए आघाडी 400 हून अधिक जागांवर विजयाचा दावा करत आहे. भाजपाचे विचार उद्दिष्ट आणि केलेली विकासकामे यामुळेच हे शक्य झालं, असा दावा भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
जनसंघापासून सुरुवात:भारतीय जनसंघाच्या स्थापनेपासून भाजपाचा प्रवास पाहिला पाहिजे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी हिंदू महासभेचा राजीनामा दिला. 21 ऑक्टोबर 1951 रोजी त्यांनी संघाच्या सहकार्याने बीजेएसची स्थापना केली. मुखर्जी यांचा काश्मीर तुरुंगात मृत्यू झाला. यानंतर उपाध्यक्ष चंद्रमौली शर्मा यांना जनसंघाचे अध्यक्ष करण्यात आले. त्यांच्यानंतर प्रेमचंद्र डोगरा, आचार्य डीपी घोष, पीतांबर दास, ए रामाराव, रघु वीरा, बच्छरास व्यास यांनी जनसंघाची जबाबदारी सांभाळली. 1966 मध्ये बलराज मधोक आणि 1967 मध्ये दीनदयाल उपाध्याय अध्यक्ष झाले. त्यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी 1972 पर्यंत आणि लालकृष्ण अडवाणी 1977 पर्यंत अध्यक्ष पदावर राहिले.
जनसंघाची अखेर :1977 मध्ये भारतीय जनसंघाचे अस्तित्व संपुष्टात आले. खरे तर यावेळी देशात प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले. अशा स्थितीत जनता पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी विलीनीकरण करावे लागेल, अशी अट घालण्यात आली होती. या अंतर्गत जनसंघ जनता पक्षात विलीन झाला. जनता पक्षाच्या सरकारमध्ये जनसंघाच्या बाजूने अडवाणी माहिती आणि प्रसारण मंत्री झाले. अटलबिहारी वाजपेयी यांना परराष्ट्र मंत्री करण्यात आले. पण, काही काळानंतर परस्परांच्या भांडणामुळे १९७९ मध्ये मोरारजी देसाईंचे सरकार पडले. या स्थितीत जनता पक्षातील संघी नेत्यांना नवे व्यासपीठ निर्माण करण्याची गरज भासू लागली. अशा प्रकारे, 6 एप्रिल 1980 रोजी मुंबईत एका नवीन राजकीय पक्षाची करण्यात आली, ज्याचे नाव भारतीय जनता पार्टी होते.