मुंबई Nyay Sankalp Sabha : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मणिपूरपासून सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रा 6,700 किलोमीटरचे अंतर पार करून मुंबईत पोहोचली आहे. आज (17 मार्च) सकाळीच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महात्मा गांधी यांचे निवासस्थान असलेल्या मणी भवन येथून न्याय संकल्प पदयात्रा काढली. या यात्रेनंतर राहुल गांधी यांनी नजीकच्या तेजपाल भवन येथे नागरिक न्याय सभा घेतली. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी 'भारत हा मोहब्बत वाला देश आहे, मग द्वेष का पसरवला जात आहे?' असा सवाल भाजपाला केला आहे. या देशातील गरीब, शेतकरी, दलित, महिला आणि तरुणांवर रोज अन्याय होत आहे. त्यांच्या प्रश्नांवर कुणीही आवाज उठवू नये, यासाठी समाजा समाजात द्वेष पसरवला जात आहे' अशी टीकाही त्यांनी केली.
काय म्हणाले राहुल गांधी? : या सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "भारत जोडो यात्रेचा आज समारोप दिवस आहे. पण, हा शेवट नसून न्यायाच्या लढ्याची ही सुरुवात आहे. मी सुरुवातीला कन्याकुमारी ते काश्मीर पायी यात्रा केली. त्यानंतर दुसरा टप्पा मणिपूर ते मुंबई असा प्रवास केला. या प्रवासात मला आपल्या भारताचं एक वेगळच रूप पाहायला मिळालं. माझ्या डोक्यामध्ये आपल्या देशाचे जे चित्र होतं ते आणि ग्राउंडवरचा आपला देश यात प्रचंड तफावत असल्याचं मला जाणवलं. या प्रवासादरम्यान, प्रत्येक वर्गावर होत असलेले भयंकर अन्याय आणि अत्याचार आणि त्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आणि समजून घेतल्या आहेत. देशवासीयांच्या आशावादी डोळ्यात लपलेली छोटी-छोटी स्वप्न मी माझ्यासोबत घेऊन जात आहे. या प्रवासानं माझा विश्वास आणखी दृढ केलाय, की देशाची पहिली गरज ही न्याय आहे. तसंच प्रत्येक घटकाला समर्पित काँग्रेसचे 5 न्याय हे आपल्या देशाला समस्यांमधून बाहेर काढू शकतात", असा विश्वास देखील राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.