महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नितीन देसाईंची शेवटची इच्छा राज्य सरकारकडून पूर्ण; 'एनडी स्टुडिओ' घेतला ताब्यात - NITIN DESAI ND STUDIO

प्रख्यात कला दिग्दर्शाक नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी व्हाईस नोटमध्ये राज्य सरकारकडून एक इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा अखेर राज्य सरकारनं पूर्ण केली आहे.

Nitin Desai Studio
नितीन देसाई एनडी स्टुडिओ (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2024, 2:17 PM IST

Updated : Nov 29, 2024, 4:07 PM IST

मुंबई - दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी मृत्यूपूर्वी व्यक्त केलेली शेवटची इच्छा अखेर सरकारनं पूर्ण केली. राज्य सरकारनं रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील त्यांचा प्रसिद्ध 'एनडी स्टुडिओ' ताब्यात घेतला आहे. या स्टुडिओचे व्यवस्थापन आता महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडं असणार आहे.

'एनडी स्टुडिओ'ची केली पाहणी : सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी 'एनडी स्टुडिओ'ला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. 'एनडी स्टुडिओ'चे कामकाज व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालवलं जाणार आहे.

'एनडी स्टुडिओ' ताब्यात घेण्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती माहिती (ETV Bharat)

'एनडी स्टुडिओ'त आवाज घुमणार : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गतवर्षी त्यांच्याच 'एनडी स्टुडिओ'मध्ये आत्महत्या केली होती. नितीन देसाईंच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यांच्या निधनानंतर शांत झालेल्या एनडी स्टु़डिओमध्ये आता पुन्हा एकदा 'लाइट्स.. कॅमेरा.. ॲक्शन' चा आवाज घुमणार आहे. नितीन देसाई यांनी उभारलेला 'एन. डी. स्टुडिओ' आता महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली आला आहे.

स्टुडिओच्या व्यवस्थापनाच्या कामांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकांच्या सनियंत्रणाखाली विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये सहव्यवस्थापकीय संचालक समन्वयक, विशेष कार्यकारी अधिकारी उपसमन्वयक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, मुख्य लेखावित्ताधिकारी आदी अधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती माहिती : 26 सप्टेंबर रोजी माजी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे मुख्य संपादक सचिन परब यांनी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी 'एनडी स्टुडिओ' राज्य सरकार ताब्यात घेणार असल्याची माहिती दिली होती. अखेर आता हा स्टुडिओ राज्य सरकारनं ताब्यात घेतला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत साधलेल्या संवादाचा व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Last Updated : Nov 29, 2024, 4:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details