मुंबईSunil Tatkare On Supriya Sule :राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी पतीचा हवाला देत, अजित पवारांवर हल्लाबोल केला होता. या टीकेला उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले, "सुप्रिया सुळे यांनी टिकेची भाषा सुधारावी अन्यथा जसेच्या तसे उत्तर दिलं जाईल," अशी कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
जशाच तसं उत्तर देऊ : "सुनेत्रा पवार या उत्तम वक्त्या आहेत. त्यांचंही तिन्ही भाषांवर प्रभुत्व आहे. त्यासोबतच त्यांनी स्थानिक पातळीवर विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून लोकोपयोगी कामातून ओळख निर्माण केली आहे. सुळे यांनी संसदेत सुनेत्रा पवार यांच्या भवितव्याबाबत निराशेपोटी असं वक्तव्य केलं. मात्र, त्यांनी यापुढं असं वक्तव्य केल्यास त्यांनाही तसंच उत्तर दिलं जाईल," असा इशारा सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळेंना दिला आहे. "सदानंद सुळे यांच्याबद्दल आम्हाला आदर होता, आहे आणि राहील. पण, महिला खासदारांचे पती पर्स घेऊन संसदेच्या प्रेक्षक गॅलरीत फिरताना दिसत नाहीत. त्यामुळं सुनेत्रा पवार यांचं संसदेतील भवितव्याबाबत सुप्रिया सुळे यांचे विधान असंस्कृत आहे. ते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारसरणीला शोभणारे नाही," असा निशाणा त्यांनी सुळेंवर साधला आहे.