मुंबईNCP MLA Disqualification :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दोन्ही गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याप्रमाणे त्यांच्यापुढे सुनावणी देखील सुरू होती; (Ajit Pawar Group) मात्र आमदार अपात्र प्रकरणी लवकर निर्णय घ्यावा यासाठी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांतर्फे याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली गेली. त्यानुसार 30 जानेवारी पर्यंत निर्णय घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला होता; परंतु राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे आमदार अपात्र प्रकरणी निर्णय घेण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार पंधरा दिवसांची मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे.
निकालाकडे सर्वांचंच लक्ष :राहुल नार्वेकर यांच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. त्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी संपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना अंतिम लेखी स्वरूपात आपलं म्हणणं मांडण्यासाठी निर्देश दिले आहेत. दोन्ही गटाकडून लेखी म्हणणं आल्यानंतर राहुल नार्वेकर 15 फेब्रुवारी पर्यंत निकाल देऊ शकतात. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अनिल पाटील काय म्हणाले?राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी बुधवारी सुनावणी दरम्यान शरद पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आला की, अजित पवार गटाच्या बैठकीत काही आमदार उपस्थित नसताना सह्या करण्यात आल्या. यावर बोलताना अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील म्हणाले की, समोरच्याकडे कोणत्या प्रकारची फॅक्ट्स सापडत नसल्यामुळं ते वारंवार ही बैठक झाली, ती बैठक झाली नाही, अशा प्रकारे बोलत होते. मात्र, आम्ही ते सिद्ध केलं आहे. त्यामुळे त्यांच्या युक्तिवादात कोणतंही तथ्य नसल्याचं अनिल पाटील यांनी सांगितलं.