महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन; काँग्रेसमध्ये बंडखोरी करुन बाहेर पडलेले शरद पवार आता पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का? - NCP 25th Anniversary - NCP 25TH ANNIVERSARY

NCP 25th Anniversary : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. मात्र अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केल्यामुळे आजचा वर्धापन दिन दोन ठिकाणी पार पडत आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 3:05 PM IST

Updated : Jun 10, 2024, 4:10 PM IST

मुंबई NCP 25th Anniversary :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज 25 वं वर्ष पूर्ण केली आहेत. 10 जून 1119 ला काँग्रेस पक्षातून बाहेर पडत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर प्रत्येक वर्धापन दिन पक्षाच्या वतीनं मुंबईसह राज्यभर मोठ्या जल्लोषात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडाळीमुळे पक्ष विभागला गेला. त्यामुळे यंदा दोन वर्धापन दिन साजरे केले जात आहेत. काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. मात्र आता पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांचं राजकारण नेमकं काँग्रेसभोवतीच का फिरत आहे, याबाबतची माहिती जाणून घेऊया या खास वृत्तातून.

दोन ठिकाणी साजरा होत आहे वर्धापन दिन :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पंचवीस वर्षे पूर्ण करत आहे. 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरद पवार यांनी स्थापना केली. मागच्या वर्षी जुलै महिन्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करुन त्यांनी भाजपासोबत सत्तेत सहभागी होणं पसंत केलं. पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांकडून पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. अजित पवार यांच्या गटाकडून मुंबईत, तर शरद पवार यांच्या गटाकडून अहिल्यानगर इथं 'वर्धापन दिना'चा कार्यक्रम साजरा केला जात आहे.

काँग्रेसभोवती का फिरतं शरद पवार यांचं राजकारण :शरद पवार यांनी नेहमीच राजकारणात आपल्या कूटनीतीने दिग्गजांना धक्के दिले. शरद पवार यांनी 1978 साली पहिली बंडखोरी केली. यावेळी त्यांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून समाजवादी काँग्रेस स्थापन करत ते वयाच्या 38 व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री बनले. 1978 च्या सरकारला पुलोद अर्थात 'पुरोगामी लोकशाही दल' सरकार म्हणून देखील संबोधलं जातं. केंद्रात इंदिरा गांधी यांचं सरकार आलं आणि 17 फेब्रुवारी 1980 साली महाराष्ट्रातलं शरद पवारांचं पुलोद सरकार बरखास्त करण्यात आलं. काँग्रेस पक्षाला 1980 च्या निवडणुकीत चांगल्या जागा मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ए आर अंतुले विराजमान झाले. दरम्यानच्या काळात शरद पवारांचा समाजवादी काँग्रेस पक्ष यावेळी विरोधात बसला. त्यानंतर शरद पवार यांनी 1987 मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये आपला समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला.

विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर सोनिया गांधींना विरोध :शरद पवार 1987 ते 1999 पर्यंत काँग्रेसमध्ये स्थिरावले होते. सोनिया गांधी 1998 साली काँग्रेसचच्या अध्यक्ष झाल्यानं शरद पवार नाराज होते. 1999 साली सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या मतभेदामुळे तसंच त्यांना पंतप्रधान पदाची उमेदवारी देण्यावरुन शरद पवार यांनी विरोध केला. सोनिया गांधी विदेशी असल्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस पक्षाला हात दाखवत 10 जून 1999 रोजी शरद पवार यांनी मेघालयमधील काँग्रेसचे नेते पी ए संगमा आणि बिहारचे तारीक अन्वर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवार यांनी आपला पक्ष पुरोगामी विचारांचा पक्ष असल्याची ओळख निर्माण केली. मराठ्यांचा पक्ष म्हणून देखील शरद पवारांच्या पक्षाला हिणवलं.

पुन्हा काँग्रेससोबत आघाडी करुन स्थापलं सरकार :काँग्रेस पक्षात असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री, लोकसभा खासदार, केंद्रीय संरक्षण मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते बीसीसीआय आणि आयसीसीआयचे अध्यक्ष अशी पदं त्यांनी भूषवली. मात्र पुन्हा एकदा 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांची महाराष्ट्रात आघाडी होऊन आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं. 2014 साली तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची राज्यात मोदी लाटेमुळे वाताहत झाली. 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या. न डगमगता शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षापेक्षा चांगली कामगिरी करून दाखवली. विधानसभा निवडणुकीमध्ये तर शरद पवार यांनी राजकीय खेळी करत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना एकत्र आणून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. केंद्रात भाजपाची सत्ता असताना अशा महाविकास आघाडीचा प्रयोग करून राज्यात सरकार स्थापन करत भाजपाला आपल्या चाणाक्य राजनीतीची झलक दाखवली. महाविकास आघाडी सरकार चांगल्या प्रकारे राज्यात काम करत असताना राजकीय भूकंप झाला. शिवसेना पक्षात फूट पडली आणि राज्यात युतीचं सरकार स्थापन झालं.

शरद पवारांचं राजकारण बेभरवशाचं :शरद पवार हे गेल्या 50 पेक्षा अधिक वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत. शरद पवार यांची राष्ट्रीय राजकारणामध्ये निश्चितच चांगली प्रतिमा आहे. शरद पवार यांची राज्यातल्या विविध पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांशी जवळीक आहे. त्यांच्या संपर्काला आणि शब्दाला राजकीय वजन आहे. मात्र या प्रतिमेला आणखीही एक बाजू आहे. ती म्हणजे बेभरवशाची. शरद पवार यांच्याबद्दल राज्यातील आणि राष्ट्रीय राजकारणातही नेहमीच संशयानं पाहिलं गेलं. शरद पवार हे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात इतकी वर्ष असूनही शरद पवारांना महत्त्वाच्या पदांवर जाता आलं नाही, याविषयी राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी खंत व्यक्त केली.

शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये होणार का विलीन :शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यावर्षी जुलै महिन्यात पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केली. अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपा शिवसेनेची साथ देऊन राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी ते विराजमान झाले. शरद पवारांचे अनेक शिलेदार अजित पवारांच्या गटात सामील झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून सामोरं गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नेत्रदीपक कामगिरी केली. शरद पवार राष्ट्रवादीला आठ जागांवर विजय मिळाला, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकच जागा मिळवण्यात यश आलं. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे संकेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का, या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले होते, "येत्या दोन वर्षांमध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होऊ शकतात. आम्ही आणि काँग्रेस पक्षात कोणताही फरक नाही. विचारानं आम्ही गांधी-नेहरू विचारसरणीचे आहोत, याबाबत आता काही सांगू शकत नाही. मात्र सहकाऱ्यांशी बोलून या संदर्भात निर्णय घेतला जाईल,"

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले आहेत. केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झालय. लोकसभेच्या निवडणुकीतील यशामुळे शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळू शकते. त्यामुळे आपल्या पक्षाची भविष्यातील वाटचाल कशी असेल, याबाबत आजच्या वर्धापनदिनी शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट करतील, असं बोललं जात आहे. त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेस पक्षात विलिनीकरणाबाबत दिलेल्या संकेताबाबत काय भूमिका घेतात, याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

  1. "गेल्या पाच वर्षांत एक-दोन व्यक्तींनीच सरकार चालवलं"- शरद पवार - NCP Foundation Day
  2. लोकसभा निवडणूक निकाल २०२४: शरद पवारांच्या चाणक्य नीतीनं खेचून आणलं यश भाजपाला दिला 'धोबीपछाड' - Lok Sabha Election Result 2024
  3. रोहित पवारांचा अजित पवार यांच्या गटातील आमदार स्वत:कडे येण्याचा दावा पण स्वपक्षातील नेत्यांवरच संशय? - Rohit Pawar twitt
Last Updated : Jun 10, 2024, 4:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details