नाशिक -कुंभमेळ्यासाठी प्रयागराज तसंच दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेनं 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान प्रयागराजकडे जाणाऱ्या 12 रेल्वे गाड्या रद्द केल्यात. यात नाशिकमार्गे धावणाऱ्या आठ गाड्यांचा समावेश आहे. यामुळे तब्बल 18 हजार प्रवाशांचे आरक्षण रद्द होणार आहे.आरक्षण केलेल्या प्रवाशांना ऑनलाइन तसंच खिडकी या दोन्ही पद्धतीने रिफंड देण्यात येईल असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
प्रयागराजला सुरू असलेल्या कुंभमेळ्यात करोडोच्या संख्येनं भाविक दाखल होत आहेत. अशात याचा सर्वाधिक ताण रेल्वे प्रशासनावर आला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत अनेक प्रवाशांचा बळी गेला. मात्र त्यानंतरही भाविकांची गर्दी कमी होताना दिसत नाही. प्रयागराज येथे महाकुंभनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे गाड्यांची संख्या वाढवली होती. मात्र गर्दी अधिक असल्यानं रेल्वेनं भुसावळ मंडळातून जाणाऱ्या आठ गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसला. यामुळे तब्बल 18 हजार प्रवाशांचे आरक्षण रद्द होणार आहे. आरक्षण केलेल्या प्रवाशांना ऑनलाइन आणि खिडकी या दोन्ही पद्धतीने रिफंड देण्यात येईल असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.