महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकरी पोहोचले मतदान केंद्रावर; नेमकं काय घडलं? - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Nashik Lok Sabha : यंदा कांदा निर्यात बंदी, त्यानंतर कांद्याचे पडलेले भाव हा लोकसभा निवडणूक प्रचारातील महाराष्ट्रातील प्रमुख मुद्दा होता. या पार्श्वभूमीवर आज (20 मे) नाशिकमध्ये काही शेतकरी गळ्यात कांद्याच्या माळा घालून मतदान केंद्रावर दाखल झाल्याचं बघायला मिळालं.

Nashik Lok Sabha farmers reached the voting center with wearing onion garland
गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकरी पोहोचले मतदान केंद्रावर (reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 2:42 PM IST

नाशिक Nashik Lok Sabha : नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्नावरुन शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर आज (20 मे) मतदानाच्या दिवशी चांदवड तालुक्यातील शेतकरी मतदार राजा चक्क गळ्यात कांद्याच्या माळा घालून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्याचं बघायला मिळालं.


नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असून केंद्र सरकार आमचे प्रश्न ऐकून घेत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तसंच हाच राग आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडगाव येथील मतदार राजानं मतदान करताना दाखवला. गळ्यात कांद्याची माळ घालत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण यांनी देखील सहभाग घेत मतदान केलं. सटाणा शहरातील मराठी शाळा येथील मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंब मतदान केलं. तर यावेळी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाणाऱ्या काही शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवल्याचा प्रकार देखील समोर आला. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळं मतदान केंद्रांवर काहीवेळ गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळालं. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत त्यांना गळ्यातील माळा काढून मतदान करण्यास रवाना केलं.


कांद्याच्या माळा राजकारण्यांना दाखवा :घडलेल्या घटनेविषयी मंत्री छगन भुजबळ यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "मतदान केंद्रात कांद्याच्या माळा नेऊन मतदान केलं त्यावर अधिकारी काहीही करू शकत नाहीत. त्यामुळं मतदान करा, कांद्याच्या माळा घालून गेलो म्हणून मतदान करू शकलो नाही, असं करू नका. जे कोणी राजकारणी आहेत त्यांना त्या कांद्यांच्या माळा दाखवा. राजकारण्यांपुढं सत्याग्रह करा. मात्र, याविषयी मतदान अधिकारी काय करणार?",असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला.

ABOUT THE AUTHOR

...view details