महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवजयंतीचे पोस्टर लावण्याचा वादातून धावत्या दुचाकीवरच मित्रावर सपासप वार, नाशकात खुनाचा थरार

शिवजयंतीचे पोस्टर लावण्याच्या वादातून दोघांनी मित्राला दुचाकीवरून नेत त्याचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एकलहरे रोडवरील किलोस्कर कंपनीच्या वॉलजवळ काल (18 फेब्रुवारी) चेतन ठमके (वय 32) याचा मृतदेह आढळला होता. या घटनेत पोलिसांना संशयित पंकज आहिरे आणि आशिष भारद्वाज या दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत.

friend's murder in CIDCO
सिडकोमध्ये मित्राचा खून

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 8:12 PM IST

नाशिक :पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणं एकलहरे रोडवर काल रविवारी युवकाचा रक्ताने माखलेला मृतदेह मिळून आला. तपासाची चक्रे फिरवत युवकाची ओळख पटवली गेली. यावेळी सिडकोतील विजयनगर मधील चेतन ठमके असं त्याचं नाव समजलं. पथकानं त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. तपासादरम्यान काल (रविवारी) सायंकाळी शिवजयंतीचं पोस्टर लावण्यावरून वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकानं संशयितांचा शोध घेतला असता दोघेही एकाच परिसरातीलच असल्याचं समजलं. संशयितांनी चेतनचा खून केल्याचं निष्पन्न झालं. तो जीव वाचवण्यासाठी पळत असल्यानं रक्ताचा सडा जमिनीवर पडला असल्याचं तपासात आढळलं.


दुचाकीवरून नेत मित्रांनी केला घात :सिडको भागात शिवजयंतीचे पोस्टर लावण्यारून चेतन ठमकेची त्याच्या मित्रांसोबत वादावादी झाली होती. यानंतर चेतनला त्याच्या मित्रांनी ट्रिपल सीट बसवून किर्लोस्कर कंपनीच्या दिशेनं नेलं. दरम्यान दुचाकीवर बसलेल्या संशयितांनी धावत्या दुचाकीवरच त्याच्यावर वार केले. यामुळे चेतननं जीव वाचवण्यासाठी दुचाकीवरून उडी घेत पळण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी व्यक्त केला आहे.


दुसऱ्या घटनेत खंडणीचा गुन्हा दाखल :नाशिकमध्ये गुन्ह्याची अशीच एक घटना अंबड पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. यामध्ये खंडणीची मागणी करत घरातील कुटुंबाला दमबाजी करणाऱ्या तरुणा विरुद्ध अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादी गणेश ठाकरे हे बाफना ज्वेलर्ससाठी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांचा मोठा भाऊ आणि आरोपी सनी उर्फ मॉन्टी दळवी यांनी उत्तम नगर बस स्टॉपजवळ भागीदारीत वडापाव विक्रीचा स्टॉल सुरू केला होता. त्यावेळी फिर्यादी ठाकरे यांच्या भावानं दळवी कडून 70 हजार रुपये घेतले होते.

जीवे मारण्याची धमकी-व्यवसायामध्ये त्यांना नुकसान झाल्यानं त्यांनी वडापाव विक्रीचा व्यवसाय बंद केला. त्यानंतर फिर्यादीच्या भावानं आरोपी मॉन्टी दळवी याला 70 हजार रुपये परत देऊनही तो अधिक पैसे मागत होता. त्याचप्रमाणे काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दळवी आणि त्याची आई फिर्यादीच्या घरी आले. यानंतर ते दोघेही 24 हजार रुपये आजच्या आज पाहिजे, अशी मागणी करू लागले. दरम्यान आरोपींनी फिर्यादी ठाकरे यांच्या वडिलांची गच्ची पकडून शर्ट फाडला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

  1. भाजपा नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग? फॉरेन्सिक तपासणीत मोठी माहिती समोर
  2. अभिषेक घोसाळकर खून प्रकरणात मोठी घडामोड, आरोपी अमरिंदर मिश्राला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
  3. "राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का?", उद्धव ठाकरे आक्रमक; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details