नाशिक : नाशिक शहरामध्ये मागील आठ दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्याचा पारा 10 अंशापर्यंत घसरल्यानं आबालवृद्धांना उबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडावं लागतंय. थंडीच्या दिवसांत शरीराला पौष्टिक घटकांची गरज असते. त्यामुळं घरोघरी सुकामेव्याचे लाडू बनवायला सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा सुकामेव्याचे भाव प्रति किलो 100 ते 150 रुपयांनी वाढले आहेत. तसंच शुद्ध देशी तुपाच्या भावात देखील वाढ झालीय. त्यामुळं थंडीसाठी बनवल्या जाणाऱ्या लाडूंसाठी गृहिणींना महागाईचा सामना करावा लागत असल्यानं त्यांचं आर्थिक बजेट काहीसं कोलमडलं आहे.
दर वाढले तरी मागणी चांगली : आरोग्यासाठी हिवाळा अधिक पोषक मानला जातो. हिवाळ्यात भूक वाढते, त्यामुळं शरीराचा 'पोषणकाळ' म्हणून हिवाळ्याकडं बघितलं जातं. अशातच थंडीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी उष्म पदार्थांचं सेवन केलं जातं. शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचं सेवन केल्यानं पोषणासह त्वचेसाठीही मदत होते, असा सल्ला डॉक्टरांकडूनही दिला जात असतो. त्यामुळे घरोघरी पौष्टिक लाडूंसाठी सुकामेव्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, यंदा गतवर्षी पेक्षा सर्वच सुकामेव्याचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. मात्र, अशात दर वाढले असले, तरी सुकामेव्याला चांगली मागणी असल्याची माहिती सुकामेवा व्यापारी सरिता शाह यांनी दिली.