महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Narayan Rane रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच - Ratnagiri Sindhudurg Constituency

Narayan Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल, यावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र, शिंदे गटाकडून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांना उमेदवारी दिली जावी, अशी आग्रही मागणी सामंत यांनी केली आहे. त्यामुळं नारायण राणे यांना उमेदवारीसाठी जोर लावावा लागणार आहे.

Lok Sabha Election
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 7:34 PM IST

Updated : Mar 15, 2024, 8:14 PM IST

मुंबई Narayan Rane:लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना जागावाटपावरून महायुतीत तिढा कायम आहे. विशेष म्हणजे भाजपानं राज्यात घोषित केलेल्या पहिल्या 20 नावांच्या यादीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव समाविष्ट नसल्यानं अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. राज्यसभेच्या खासदारांनी तसंच केंद्रात मंत्री असलेल्या नेत्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत उतरावं, असा आदेश भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं दिला आहे.

नारायण राणेंना करावा लागणार संघर्ष? : नारायण राणे यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला असून त्यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी, अशी भाजपाची इच्छा आहे. सध्याच्या घडीला या मतदारसंघावर शिवसेना (ठाकरे गटचे) खासदार विनायक राऊत यांचा दबदबा आहे. विनायक राऊत मागील दोन टर्म या जागेवर मोठ्या मताधिक्यानं निवडून येत आहेत. अशातच शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर रत्नागिरीचे आमदार तथा मंत्री उदय सामंत शिंदे गटासोबत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातून त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यानं त्यांच्या उमेदवारीसाठी तसे प्रयत्न मागील काही काळापासून सामंत करताय. अशात नारायण राणे यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी शिंदे गट तयार नसल्यानं खुद्द नारायण राणे यांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

विनायक राऊत हॅट्रिक करण्यासाठी उत्सुक :कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा नवीन लोकसभा मतदारसंघ 2008 साली अस्तित्वात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील 3 तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 अशा एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे. सध्याच्या घडीला रत्नागिरी - उदय सामंत, सावंतवाडी - दीपक केसरकर हे दोन विद्यमान आमदार शिंदे गटासोबत आहेत. तर राजापूर - राजन साळवी, कुडाळ - वैभव नाईक हे दोन विद्यमान आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आहेत. तर चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे शेखर निकम हे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. कणकवलीमध्ये नितेश राणे भाजपाचे एकमेव आमदार आहेत. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेना उबाठा गटाचे विनायक राऊत विद्यमान खासदार आहेत. त्यांनी 2014 मध्ये सुद्धा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात विजयी मिळवला होता. आता त्यांची तिसरी टर्म असून त्यांना कुठल्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण राणे हे लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. मात्र, पक्षानं त्यांना निवडणूक लढवण्याची तयारी केलीय. त्यामुळं राजकीय अस्तित्वासाठी नारायण राणे यांना ही निवडणूक लढवावी लागण्याची चिन्ह दिसत आहेत. येत्या काही दिवसात याबाबतचं चित्र स्पष्ट होईल.

भेटीगाठी चर्चांवर भर :रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर पूर्वीपासून शिवसेनेचं वर्चस्व आहे. मात्र, शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिंदे गट तसंच ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत घरोबा केल्यानं निष्ठावंत शिवसैनिक शिंदेंसोबत जातील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या मतदारसंघावर दावा केला केल्यानं निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. भाजपाकडून या मतदारसंघासाठी राज्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाचे नेते प्रमोद जठार यांच्या नावाचीसुद्धा चर्चा आहे. मात्र, भाजपाकडून नारायण राणे याचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. अशा परिस्थितीत शिवसेना (शिंदे गट) ही जागा भाजपासाठी सोडणार का? हा प्रश्न अद्याप कायम आहे. या संदर्भात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत दोनवेळा भेट घेतल्याची माहिती आहे. तर, दुसरीकडं उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही नारायण राणे यांची काही दिवसापूर्वी भेट घेतलीय. उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली जावी, अशी आग्रही मागणी सामंत यांची आहे. त्याचबरोबर या मतदारसंघातून शिवसेनेनं जागा लढवावी, असा एक मोठा मतप्रवाहसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं आहे.

भाजपाचं केंद्रीय नेतृत्व पडतंय कमी :भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्यसभेतील बऱ्याच खासदारांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवलं आहे. मात्र, नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदार संघात निवडणूक लढण्याची संधी दिल्यास उमेदवारीचा तिढा उद्भवण्याची शक्यता आहे. याबाबत गुरुवारी कोकण दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हा तिढा सुटला असल्याचं सांगितलं होतं. मात्र, महायुतीचा उमेदवार कोण? हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. नारायण राणे यांचं नाव भाजपानं घोषित केलेल्या पहिल्या यादीतच यायला हवं होतं. परंतु ते अद्याप घोषित न झाल्यानं रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील महायुतीतील डावपेच अद्याप कायम असल्याचं स्पष्ट होत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोकणातील वजनदार नेते नारायण राणे यांनाच आपलं राजकीय वजन वापरून या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागणार आहे. कारण भाजपाचं केंद्रीय नेतृत्व नारायण राणे यांच्या उमेदवारीसाठी एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचं सध्याचं चित्र आहे.

नारायण राणेंसाठी लढाई अवघड :नारायण राणे कोकणातील वरिष्ठ नेते आहेत. इतर राजकीय पक्षांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. कोकणातील त्यांचा जनसंपर्क फार मोठा आहे. नारायण राणे शिवसेनेत असताना कोकणात राणे यांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणामध्ये होतं. नंतर त्यांनी काँग्रेसध्ये प्रवेश केला, तेव्हासुद्धा काँग्रेसनं नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांना 2009 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. परंतु 2014-2019 या दोन लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांनी सलग दोनदा पराभव केला. 2014 मध्ये विनायक राऊत यांना 4,92,900 मतं मिळाली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना 4,56,013 मतं मिळाली होती. अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघातून नारायण राणे यांना जिंकून येण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांना विश्वासात घेऊन रणनीती आखावी लागणार आहे. किरण सामंत उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतील का? एकनाथ शिंदे गटानं त्यांना उमेदवारी दिली नाही, तर ते अपक्ष उभे राहतील का? असे अनेक प्रश्न उभे असताना नारायण राणे यांच्यासाठी ही एक मोठी लढाई असणार आहे.

हे वाचलंत का :

  1. Loksabha Election : लोकसभा निवडणूक वेळापत्रक उद्या जाहीर होणार, निवडणूक आयोगाची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद
  2. Lok Sabha Election 2024 : 'महाविकास आघाडीचा निर्णय झाल्यावर पाहू, आमच्याकडं 48 जागांचा पर्याय' : प्रकाश आंबेडकरांचा सूर बदलला
  3. Ajit Pawar Vs Vijay Shivtare : 'अजित पवारांमुळे माझी किडनी गेली'; विजय शिवतारेंचा पुन्हा हल्लाबोल
Last Updated : Mar 15, 2024, 8:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details