नागपूर Congress Protest In Nagpur : महिला काँग्रेसच्या नेतृत्वात आज (29 ऑगस्ट) नागपुरात 'नारी न्याय आंदोलन' करण्यात आलं. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा, महासचिव मुकुल वासनिक, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी या आंदोलनात सहभागी झाले होते. सुमारे 5 तास आंदोलन केल्यानंतर अलका लांबा यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या महिलांनी काही काळ रस्ता रोखून धरला होता. मात्र, पोलिसांनी महिला आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
महामहिम तुम्ही घाबरू नका, आम्हाला धीर द्या : यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना अलका लांबा म्हणाल्या की, "राष्ट्रपती मुर्मू म्हणतात की त्या चिंतेत आहेत. ज्या देशाच्या राष्ट्रपती घाबरलेल्या असतील, त्या देशातील महिलांचं काय होणार? मुर्मू जी तुम्ही घाबरु नका, आपल्या पदाचा वापर करून सर्व महिलांना धीर द्या. आता खूप झालंय कोणी आमचं रक्षण करेन, याची आम्ही वाट पाहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही गेली दहा वर्ष गुन्हेगारांना वाचवण्याचं काम केलं. ब्रिजभूषण सिंहला कोणी वाचवल?", असा सवाल लांबा यांनी केला. तसंच महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालंय. त्यामुळं राजकीय महिला आरक्षण लागू करावं, सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील 50 टक्के महिला आरक्षण लागू करावं, अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.
बदलापूरची शाळा आरएसएसच्या माणसाची : यावेळी आरएसएस आणि भाजपावर टीका करत नाना पटोले म्हणाले की, "बदलापूरच्या ज्या शाळेत मुलींवर अत्याचार झाला ती शाळा आपट्यांची होती. ती आरएसएसची शाळा होती. तिथून पुरावे नष्ट करण्यात आले, सीसीटीव्ही गायब केले गेलेत. भाजपाचा सरकारी भाडोत्री वकील उज्ज्वल निकम मुलींना झालेली इजा ही सायकल चालवताना झाली असं सांगून दिशाभूल करत आहे. मालवणमधील छत्रपतींची मूर्ती बनवणारा आपटेच होता. त्या माणसानं मूर्ती बनवताना अनेक चुका केल्या. महात्मा गांधींच्या हत्येतही आपटे होता", अशा शब्दात नाना पटोले गरजले.