नागपूर-विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पोलिसांकडून वाहनांची काटेकोरपणं तपासणी सुरू आहे.पोलिसांनी बुधवारी रात्री मोपेडवरून १ कोटी ३५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे.
शाबीर खान हाजी नासिर खान (27) असे रोकड घेऊन जात असलेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पुढे आलीय. एक व्यक्ती मोठी रोकड घेऊन जाणार असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्याला शोधून ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे रोकड मिळाली आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीची विचारपूस केल्यावर एवढ्या रकमेबद्दल समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्या व्यक्तीनं उडवाउडवीचे उत्तर दिल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण रक्कम ताब्यात घेत निवडणुकीच्या काळातील नियमाप्रमाणे कारवाई केली आहे. ही रोकड नेमकी कोणाची यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
अपक्ष उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल-नुकतेच नागपुरातील अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांच्या प्रचारासाठी लागणाऱ्या साहित्यातून पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं 2,700 रेशन किट जप्त केले आहेत. त्यानंतर उमेदवार जिचकार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी महेंद्र नगर आणि मोतीबाग येथे 15 लाख रुपये किमतीचे किट जप्त करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार मोतीबागच्या सेंट्रल रेल्वे कॉलनीत 220 किट्स आणि महेंद्र नगरमध्ये 2,500 हून अधिक रेशनचे किट्स सापडले. ही कारवाई निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं केली. निवडणू काळात आचारसंहिता लागू असल्यानं विविध कलमान्वये पोलिसांनी अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
- जिचकार यांनी फेटाळले आरोपनागपूर पश्चिममधून निवडणूक लढवत असलेल्या जिचकार यांनी या किट्स आपल्या मालकीच्या नसल्याचा दावा केला. विरोधकांनी त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचेही जिचकार यांनी सांगितलं.