नागपूर Nagpur Crime : नागपूरला राज्याच्या उपराजधानीचा दर्जा जरी असला तरी गुन्हेगारीच्या बाबतीत मात्र शहर राज्याची राजधानीचं ठरत आहे. गृहमंत्र्यांच्या शहरात गेल्या 14 दिवसांत तब्बल 10 हत्येच्या घटना उघडकीस आल्या. त्यात दोन दुहेरी हत्याकांडाचाही समावेश आहे. नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल हे अद्याप आपल्या कामाचा ठसा उमटवू शकलेले नाहीत. किंबहुना गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती कमी झाल्याचं चित्र आहे.
दोन वर्षांपूर्वी शून्य हत्येची नोंद : दोन वर्षांपूर्वी याच महिन्यात नागपूर शहरात शून्य हत्येची नोंद झाली होती. मात्र यंदा हत्येच्या घटनांचे जुने सर्व रेकॉर्ड मोडीत निघतील की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर शहरामध्ये वर्षभरात घडणाऱ्या हत्येच्या घटनांच्या विचार केला तर, पाच वर्षांपूर्वी हा आकडा सरासरी शंभर इतका होता. गेल्या काही वर्षात हत्येच्या घटनांमध्ये बरीच घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी नागपुरात 76 खुनाच्या घटना घडल्या होत्या.
या महिन्यात 10 हत्या : डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी 1 फेब्रुवारीला नागपूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्याच्या अवघ्या 12 तासात शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैश्याच्या वादातून दुहेरी हत्याकांड घडलं. तेव्हापासून सुरू झालेली हत्येची मालिका अद्यापही थांबलेली नाही. 4 फेब्रुवारी रोजी वाठोडा भागात वर्चस्वाच्या वादातून दोघांनी एका इसमाचा खून केला. त्यानंतर 9 फेब्रुवारीला नंदनवन भागात उधारीच्या पैशातून उद्भवलेल्या झालेल्या वादातून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. 10 फेब्रुवारीला क्रिकेटच्या वादातून एका तरुणाची हत्या झाली. तर 12 फेब्रुवारीला मित्राच्या प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या झाली.