नागपूर :नूतन वर्षाच्या स्वागताला गालबोट लावण्याचा प्रयत्न नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं उधळून लावलाय. पोलिसांनी पाच सराईत गुन्हेगारांना अटक करून तब्बल 55 लाख 40 हजार रुपये किमतीचे 554 ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त केले आहे. हे ड्रग्ज 31 डिसेंबरच्या रात्री शहरातील विविध हॉटेल्स, बार आणि पार्टीच्या ठिकाणी पोहचवले जाणार होते. मात्र, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत ड्रग्जसह 66 लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे राजस्थानमधून हे ड्रग्ज शहरात आणलं जात होतं.
हॉटेल्स, बार आणि पबमध्ये ड्रग्जचा पुरवठा :नवीन वर्षाचं स्वागत करताना हॉटेल्स, बार आणि पबमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा केला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला समजली होती. नागपूर शहरा एमडी ड्रग्जची मोठी खेप येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई केली. यावेळी पोलिसांना एका वाहनातून 55 लाख 40 हजार रुपये किमतीचे 554 ग्रॅम एम डी ड्रग्ज आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पवन उर्फ मिहीर राजेंद्र मिश्रा (39), पलाश प्रमोद दिवेकर (21), सुमित रमेश चिंतलवार (35),शेख अतिक फरीद शेख (25), मनीष रंजित कुशवाह (45) या आरोपींना अटक केली आहे.
नवीन वर्षाच्या पार्टीला राजस्थानमधून आणलेलं ड्रग्ज पोलिसांनी पकडलं (Reporter) एम डी ड्रग्जचा राजस्थान ते नागपूर प्रवास :नागपूर पोलिसांनी जप्त केलेलं ड्रग्ज राजस्थान येथून मध्यप्रदेश मार्गे नागपूरला आणण्यात येत होते. ड्रग्जचा साठा असलेली गाडी ही शहारात येत असल्याची सूचना मिळताच अमली पदार्थ विरोधी पथकानं कारवाई करत अमली पदार्थ तस्करांचा डाव उधळून लावला. कोराडी पोलीस ठाण्यात कलम 8 (क), 22(क),29 एन.डी.पी.एस. अक्ट-1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपींवर अनेक गुन्हे : नागपूर शहरात 31 डिसेंबरकरीता एम डी ड्रग्ज राजस्थान येथून मध्यप्रदेश मार्गे आरोपी घेवून येत होते. नागपूर शहरात प्रवेश करतेवेळी कोराडी तलाव याठिकाणी आरोपी पवन राजेंद्र मिश्रा व सुमित चिंतलवार यांना एम डी ड्रग्ज आणि वाहनासह ताब्यात घेण्यात आले. आरोपी पवन मिश्रा या विरूध्द खुन, खुनाचा प्रयत्न, फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. दुसरा आरोपी सुमित चिंतलवार विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसह मोक्का, फायरींग करणे, अग्निशस्त्र बाळगणे, इत्यादी गुन्हे दाखल आहेत. याशिवाय अटक करण्यात आलेला तिसरा आरोपी शेख अतिक उर्फ भुरू याचे विरूध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे तर मनिष कुशवाह याचे विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा :
- बनावट औषधांची रुग्णांना विक्री: आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता, ठाण्यात खळबळ
- राज्यभरात बनावट औषधांचा सुळसुळाट, रुग्णांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ
- अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 16 अफ्रिकन तस्करांना ठोकल्या बेड्या; 12 कोटींचे अमली पदार्थ जप्त