नागपूर : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असून विरोधकांनी सरकारवर विविध विषयावरुन मोठा हल्लाबोल सुरू केला आहे. भाजपासह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे काही आमदार रेशीमबागेत गेल्यानं विरोधकांनी टीका केली. मात्र यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकां टोला लगावला. "रेशीमबागेत मी पहिल्यांदाच आलो नाही, माझी सुरुवात संघाच्या शाखेतून झाली आहे. त्यानंतर मी शिवसेनेत आलो," असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.
शिवसेनेचे आमदार संघ मुख्यालयात : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात बौद्धिक वर्ग घेतला जातो. दरवर्षी या वर्गाचं आयोजन करण्यात येते. यावेळी संघाच्या मुख्यालयात जाण्यावरुन विरोधकांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. मात्र तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांसह संघाच्या रेशीमबागेतील शाखेत हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, की "माझी सुरुवात संघातून झाली आहे, त्यानंतर शिवसेनेतून. मी अगोदर संघाच्या शाखेत जायचो, मग बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत. संघाचे स्वयंसेवक प्रचंड शिस्तबद्ध आणि समर्पण करणारे असतात. देवेंद्र फडणवीस हे देखील एक स्वयंसेवक आहेत. आम्ही झोकून देऊन समाजहिताचं काम करत आहोत."