मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीवजा फोन आलाय. हा फोन रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर करण्यात आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीनं तो लष्कर-ए-तोयबाचा सीईओ असल्याचं सांगितल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल :शनिवारी (16 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजेच्या सुमारास रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर फोन आला. फोनवरील व्यक्तीनं तो लष्कर-ए-तोयबाचा सीईओ असल्याचं सांगत मागचा रस्ता बंद करा. इलेक्ट्रिक कार खराब झाली आहे, असं म्हणून फोन ठेवला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीनुसार माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा कोणाचा तरी खोडसाळपणा असू शकतो.
धमकीचा ई-मेल :याआधी गुरुवारी (15 नोव्हेंबर) मुंबईतील जेएसए लॉ फर्म आणि जेएसए कार्यालय कमला मिल लोअर पर्ल यांना बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारा ई-मेल आला होता. कंपनीच्या अधिकृत आयडीवर हा मेल आला. फरझान अहमद असं मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. फर्मच्या कार्यालयात आणि बॅलार्ड इस्टेटच्या कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचं त्यानं लिहिलं होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केलाय.
मुंबई विमानतळालाही मिळाली धमकी :गुरुवारी (14 नोव्हेंबर) मुंबई विमानतळावर बॉम्बची धमकी मिळाली होती. एका अज्ञात व्यक्तीनं मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या सीआयएसएफला फोन करुन विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं सीआयएसएफ कर्मचाऱ्याला फोन करून विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचं सांगितलं होतं. तपासादरम्यान, मोहम्मद नावाचा एक व्यक्ती स्फोटक सामग्रीसह मुंबईहून अझरबैजानला जाण्याचा बेत आखत असल्याचं समोर आलं. 27 ऑक्टोबरलाही मुंबई विमानतळावर धमकी देण्यात आली होती. विमानात स्फोट झाला तर एकही प्रवासी वाचणार नाही, असं सांगण्यात आलं. तपासादरम्यान ही धमकीही खोटी असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान, गेल्या वर्षाभरापासून देशातील शाळा, हॉटेल्स, विमानतळ, बाजारपेठा, रेल्वे, बस आदी ठिकाणी बॉम्बनं हल्ला करण्याच्या धमक्यांमध्ये वाढ होत आहे.
हेही वाचा -
- खलिस्तानी दहशतवादी पन्नूनं दिली राम मंदिर उडवण्याची धमकी; सुरक्षेत वाढ
- शाहरुख खान धमकी प्रकरणात मोठा ट्विस्ट; कथित आरोपी म्हणतो, माझा फोन चोरीला गेला होता...
- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला मिळाली धमकी, मुंबई पोलिसांनी रायपूरच्या वकिलाला केली अटक