मुंबई Mumbai Murder News : मुंबईतील आलिशान भागांपैकी एक असलेल्या नेपियन्सी रोड येथील तान्ही हाईट्स या टॉवरमध्ये 20 व्या मजल्यावर राहणाऱ्या 63 वर्षीय ज्योती शाह या महिलेचा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 24 तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. कन्हैया कुमार पंडित (20) असे अटकेतील आरोपीचं नाव आहे. त्याला जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख यांनी दिलीय. चोरी करण्याच्या हेतूनं आरोपीनं हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
दोन दिवसांपूर्वीच ठेवलं होतं कामावर : एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, खून प्रकरणातील आरोपीला भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आलंय. मयत ज्योती शाह यांचे पती मुकेश शाह हे दागिन्यांच्या शोरुमचे मालक आहेत. त्यांच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम 302 अंतर्गत एफआयआर नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला. पोलीस तपासात शाह यांच्या घरात काम करणारा एक नोकर बेपत्ता असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याचं नाव कान्हैय्या कुमार पंडित असं आहे. पंडित याला दोनच दिवसांपूर्वी मुकेश शाह यांनी कामावर ठेवलं होतं. त्याचे वडील तान्ही हाइट्सजवळील इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. आरोपी कन्हैय्या कुमार पंडित हा बिहार राज्यातील सीतामढी येथील राहणारा आहे.
दागिन्यांमुळं खून झाल्याची शक्यता : मलबार हिल पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "मंगळवारी संध्याकाळी मुकेश शाह यांनी ज्योती यांना फोन केला. पण ज्योती यांनी फोन घेतला नाही. त्यानंतर मुकेश घरी पोहोचले. मुकेश यांनी घराची बेल वाजवली. पण, त्यांच्यी पत्नीनं दरवाजा उघडला नाही. त्यानंतर मुकेश यांनी स्वत:कडं असलेल्या चावीनं घराचा दरवाजा उघडला. मुकेश बेडरुममध्ये गेले असता त्यांनी ज्योती शाह यांना बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहिले. ज्योती यांच्या नाकाला जखम झालेली दिसत होती. ज्योती यांचा खून करण्यात आला. त्यावेळी त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या गायब होत्या. या बांगड्यांची किंमत सुमारे तीन लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतंय.