महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालिकेच्या आरोग्य दूतांचेच आरोग्य धोक्यात, सफाई कर्मचाऱ्यांचा संघर्ष - EMPLOYEES HEALTH

मुंबई महापालिकेच्या कामाठीपुरातील सफाई कामगारांच्या चौक्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळं सफाई कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

Cleaning Workers News
सफाई कर्मचाऱ्यांचा संघर्ष (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2025, 7:03 PM IST

मुंबई : "ही आहे आमच्या कामाठीपुरातील सफाई कर्मचाऱ्यांची चौकी. साहेब तुम्हीच बघा काय अवस्था आहे. आम्ही इथं जेवायला बसलो की आमच्या डब्यात वरतून किडे, अळ्या पडतात. चौकीच्या पत्र्यांना छिद्रं आहेत. तिथून उंदीर येतात आणि आमच्यात सामानाची नासधूस करतात. आम्ही सफाई कर्मचारी आहोत पण आमच्या चौक्या वाईट अवस्थेत आहेत. आमचं सफाईचं सामान ठेवण्यास जागा नाही. आम्ही इथेच आमचा झाडू, घमेली, बूट ठेवतो आणि इथेच जेवतो. चौकीचे पत्रे फाटले आहेत. आम्हाला कपडे बदलताना भीती वाटते. कोणी बघत तर नाही ना? अशी कायम मनात भीती असते. साहेब तुम्हीच सांगा आम्ही इथे कसं जेवायचं आणि कसं काम करायचं?" ही प्रतिक्रिया आहे मुंबईतील एका सफाई कर्मचारी महिलेची.



आरोग्य आलं धोक्यात : कोविड काळ विसरला असेल असा एकही माणूस तुम्हाला दिसणार नाही. याच कोविड काळात जगभरात बृहन्मुंबई महानगरपालिकेची चर्चा होती. कोरोना काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी मुंबईत केलेलं काम चर्चेचा विषय ठरलं. आशियातील सर्वात मोठी धारावी झोपडपट्टी असेल किंवा कामाठीपुरा असेल अशा भागामध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी केलेलं काम जगभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. आपल्या जीवावर उदार होऊन कोरोना काळात ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी मुंबईकरांची काळजी घेतली. कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामामुळं त्यांना आरोग्य दूत म्हटलं जाऊ लागलं. आजही पालिकेचे आरोग्य दूत जेव्हा मुंबईकर झोपेत असतात, तेव्हापासून ते अगदी रात्रीपर्यंत देखील मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. मात्र, आता याच आरोग्य दूताचं आरोग्य धोक्यात आलय.

प्रतिक्रिया देताना अशोक सावंत (ETV Bharat Reporter)



आम्ही जेवायचं कुठं? : कामाठीपुरा हे नाव जरी एखाद्यानं उच्चारलं तरी अनेक जण नाकं मुरडतात. मात्र, या परिसराला स्वच्छ ठेवण्याचं काम बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी करतात. कामाठीपुरातील गल्ली क्रमांक पंधरा समोर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या तीन चौक्या आहेत. या चौक्यांमध्ये एकूण 120 सफाई कर्मचारी असून, त्यापैकी 45 महिला सफाई कर्मचारी आहेत. मात्र, या चौक्यांची दुरवस्था झाल्यानं आज या सफाई कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलं. कर्मचाऱ्यांच्या तुलनेत चौक्या लहान असल्यानं अनेक सफाई कर्मचारी शौचालयासमोर बसून डबा खातात. "एका बाजूला सफाईचं सामान त्याचा वास, दुसऱ्या बाजूला शौचालयाचा वास, चौकीच्या आत जेवायला बसलो तर छतावरून पडणारे किडे आता तुम्हीच सांगा आम्ही जेवायचं कुठं?" असा सवाल सध्या कामाठीपुरातील सफाई कर्मचारी विचारत आहेत.

पावसाळ्यात चौकीला शॉक लागतो : एका सफाई कर्मचाऱ्यानं सांगितलं, "पावसाळ्यात तर आमची याहून वाईट अवस्था असते. संपूर्ण चौकी गळते. त्यात पावसाळ्यात एखादा उंदीर चौकीत मेला तर त्याला शोधायला चार दिवस लागतात. मेलेला उंदीर शोधताना हाताला पत्रा लागल्यानं आमचे अनेक सहकारी जखमी झाले आहेत. तर इथली विद्युत व्यवस्था व्यवस्थित नाही. पावसाळ्यात चौकीला शॉक लागतो. आता तुम्हीच सांगा एखादा कर्मचारी आत झोपला असेल आणि त्याचवेळी करंट पास झाला तर त्या कर्मचाऱ्यांच्या जीवाचं काय होईल? मला स्वतःला इथं शॉक लागला आहे. साहेब तुम्हीच सांगा आम्ही जगायचं कसं?" अशी कैफियत एका सफाई कर्मचाऱ्यानं "ईटीव्ही भारत"शी बोलताना मांडली.



पालिका प्रशासनाला 28 फेब्रुवारीपर्यंत वेळ: यासंदर्भात म्युनिसिपल मजदूर युनियनचे संघटक अशोक सावंत म्हणाले, "चौकीच्या दुरवस्थेमुळं अनेक कर्मचारी आतापर्यंत आजारी पडले आहेत. चौक्या ठीक करण्यासाठी आम्ही मागील अनेक वर्ष पालिका अधिकाऱ्यांसोबत पत्र व्यवहार करत आहोत. इथले स्थानिक अधिकारी या चौकीच्या विस्ताराबाबत सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. आमच्या पत्रव्यवहाराला ते उत्तर देत आहेत. मात्र, मुख्यालयात वरिष्ठ पातळीवर याबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वीच आम्ही किरण दिघावकर यांची भेट घेतली. त्यांनी मी स्वतः चौकीला भेट देईन असं सांगितलं. पण, मागील इतक्या वर्षात जे झालं नाही ते आता होईल अशी आम्हाला आशा आहे. आम्ही पालिका प्रशासनाला 28 फेब्रुवारी पर्यंत वेळ दिलाय. 28 फेब्रुवारीपर्यंत या चौकीबाबत प्रशासनाने काही निर्णय न घेतल्यास एक मार्चला सर्व सफाई कर्मचाऱ्यांसोबत आम्ही काम बंद आंदोलन करू. सफाई कर्मचारी चौकीत येतील, हजेरी लावतील मात्र, कोणीही सफाईसाठी बाहेर फिल्डवर जाणार नाही." असा थेट इशाराच सावंत यांनी दिला.

सर्व चौक्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणार : या संदर्भात आम्ही घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं, "मी स्वतः त्या चौकीत जाऊन पाहणी करणार आहे. कर्मचाऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या एक मार्चच्या आत आम्ही सोडवू. इतकंच नाही तर मुंबईमध्ये जितक्या काही सफाई कर्मचाऱ्यांच्या चौक्या आहेत त्या सर्व चौक्या सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील." अशी प्रतिक्रिया किरण दिघावकर यांनी दिली.

हेही वाचा -

  1. Devendra Fadnavis : नागपूरमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प; नेदरलँडच्या कंपनीसोबत देवेंद्र फडणवीसांची चर्चा
  2. Ganeshotsav 2022 गणेश विसर्जनासाठी 150 फिरते हौद उभारण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय
  3. Chandigarh Commissioner Anindita Mitra : 'मुंबईच्या धर्तीवर चंदीगडमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर कचरा व्यवस्थापन राबविणार'

ABOUT THE AUTHOR

...view details