मुंबई Mumbai News : सध्याच्या स्थितीला वाढतं प्रदूषण हे बृहन्मुंबई महानगरपालिके पुढील सर्वात मोठं संकट आहे. प्रदूषणावर आळा घालण्यासाठी पालिकेमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आपण शाळेपासूनच शिकत आलोय की, वाढती वृक्षतोड प्रदूषणाला कारणीभूत असते. मात्र, मुंबईत नजर जाईल तिकडं उंच इमारती पाहायला मिळतात. त्यातच मुंबईत सध्या विविध प्रकल्प राबवले जात आहेत. कोस्टल रोड असेल, रस्त्यांची काँक्रिटीकरण असेल किंवा मेट्रो प्रकल्प असेल या प्रकल्पांमध्ये मुंबईत जी काही रस्त्याच्या कडेला झाडं आहेत, ती देखील तोडली जात आहेत. नियमानुसार या झाडांच पुनर्रोपण करणं गरजेचं आहे. तसंच नियमाला धरून पालिकेनं झाडांचं पुनर्रोपण केलंही. मात्र, यातील किती झाडं जगली हा मात्र आता चिंतेचा विषय बनलाय. त्यामुळं शासनाचा 'झाडे लावा, झाडे जगवा' हा नारा महानगरपालिका फक्त कागदावरच राबवते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सहा वर्षांत हजारो झाडं तोडली : महानगरपालिकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार, 2018 ते 2023 या कालावधीत विविध विकास कामांसाठी मुंबईतील तब्बल 21,028 झाडं तोडण्यात आली आहेत. यात सर्वाधिक झाडं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्प आणि कोस्टल रोड प्रकल्पांसाठी हटवण्यात आली. यातील 21,916 झाडं पालिकेच्या उद्यान विभागामार्फत पुन्हा 24 प्रभागांत लावण्यात आली. पालिकेच्या 24 प्रभागांपैकी नऊ प्रभागांमध्ये 4338 झाडं लावण्यात आली. मात्र, या 4338 झाडांपैकी केवळ 963 झाडं जगल्याचं पालिकेच्या उद्यान विभागामार्फत सांगण्यात आलंय.
2011 नंतर झाडांची गणना नाही :लोकसंख्येप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका उद्यान विभागामार्फत मुंबईतील झाडांची देखील गणना केली जाते. मात्र, या विभागानं 2011 नंतर मुंबईतील झाडांची कोणतेही गणना केलेली नाही. पालिकेच्या 2011 च्या आकडेवारीनुसार मुंबईत एकूण 29, 75, 283 झाडे होती. त्यात 2018 ते 2023 या सहा वर्षात तब्बल 21,028 झाडे तोडण्यात आली. पण, 2011 ते 2018 या आठ वर्षात किती झाड तोडण्यात आली? याची आकडेवारी मात्र पालिकेनं दिलेली नाही. या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाला विचारणा करण्यात आली असता पालिकेनं आपल्या उत्तरात सांगितलं की, प्रशासनामार्फत वृक्षतोडीसाठी देण्यात आलेल्या परवानग्या या विकास कामा आणि मुंबईकरांसाठी पायाभूत सुविधांसाठी आहेत. यातील 90% परवानग्या याच कामांसाठी आम्ही दिल्या आहेत. मुंबईतील प्रदूषण आणि झपाट्याने घटत जाणारी झाडांची संख्या यासाठी वरळी येथील महालक्ष्मी रेस कोर्स येथे तीनशे एकर जागेवर थीम पार्क उभारण्याचा आमचा प्रस्ताव आहे. या थीम पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या सेंट्रल थीम पार्कच्या माध्यमातून मुंबईत झालेली पर्यावरणाची हानी भरून काढण्याचा आमचा मानस आहे.
1 झाड तोडलं तर 2 झाडं लावण्याचा नियम : या संदर्भात पर्यावरणवादी कार्यकर्ते जय शृंगारपुरे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की, तुमच्याकडं जी आकडेवारी आहे ती फार कमी आहे. आम्ही पालिकेकडं वर्षानुवर्ष पाठपुरावा करत आहोत. माहिती अधिकारांतर्गत जी काही माहिती दिली जाते ती अतिशय तोटक आहे. मुंबईतील विविध प्रकल्पासंदर्भातील आकडेवारी तुमच्याकडं आहे. मात्र, या प्रकल्पांसोबतच मुंबईत अनेक इमारतीही उभ्या राहत आहेत. या इमारती बांधण्यासाठी महानगरपालिका परवानगी देते. यात पालिकेचा नियम आहे, तो म्हणजे तुम्ही जर 1 झाड तोडलं तर त्या बदल्यात तुम्हाला 2 झाडे लावावी लागतात. यासाठी 15 दिवसाचा कालावधी पालिका मार्फत दिला जातो. मात्र, तोडलेली झाडं किती बिल्डर पुन्हा लावतात? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळं आज मुंबईकरांना प्रदूषणासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. तसंच या सर्वांमध्ये पालिका उद्यान विभाग आणि बिल्डर यांचं साटलोट असतं", असंही शृंगारपुरे म्हणाले.
हेही वाचा -
- Mumbai Water Supply Reduction: जलशुद्धीकरण केंद्राच्या परिरक्षण कामामुळे 24 एप्रिल पर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात 5 टक्के कपात
- Clean Up Marshals : सावधान! आता रस्त्यावर थुंकणे पडेल महागात; दंड भरण्याची येईल वेळ
- मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पालिकेचा जलसाठा आला निम्म्यावर, आजपासून पाणीकपात