महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत पार पडणाऱ्या मतदानाकरिता पोलिसांसह प्रशासनाकडून तयारी, विचारवंतांकडून मतदानाचं आवाहन - Mumbai lok sabha voting

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याकरिता आज ( 20 मे ) 13 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरामधील 6 मतदारसंघाचा समावेश आहे. मुंबई पोलीस दलाकडून बंदोबस्ताकरिता 2,475 पोलीस अधिकाऱ्यांसह इतर पोलीस कर्मचारी अधिकारी तैनात असणार आहे. मतदान केंद्रावर नियमांचे पालन करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.

Mumbai lok sabha election
मुंबई लोकसभा मतदान (Source- ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 11:32 AM IST

Updated : May 20, 2024, 6:08 AM IST

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा आज पार पडत आहे. आज मुंबईत पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे, अशी माहिती आस्थापन विभागाचे पोलीस आयुक्त अकबर पठाण यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणूक 2024 च्या 5 व्या टप्प्यांतील मतदान आज होणार आहे. मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे.


22,100 पोलीस अंमलदारांसह विविध पोलीस कर्मचारी तैनात-मुंबई पोलीस दलाकडून 5 अपर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उप आयुक्त, 77 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2,475 पोलीस अधिकारी, 22,100 पोलीस अंमलदार आणि 3 दंगल काबु पथक (RCP) बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांचसोबत अतिरिक्त मदतीकरीता 170 पोलीस अधिकारी, 5,360 पोलीस अंमलदार आणि 6,200 होमगार्ड असे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. तसेच महत्वाच्या ठिकाणी 36 केंद्रीय सुरक्षा दले (CAPF / SAP) यांची बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे.

नियमांचे पालन करण्याचं आवाहन-लोकसभा निवडणूक 2024 साठी आचारसंहिता 16 मे पासून लागू झाली. शनिवारी ( 18 मेपर्यंत) विविध कायद्याअंतर्गत मुक्त आणि निष्पक्ष निवडणुक पार पाडण्याकरीता एकूण 8088 लोकांवर प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेल्या आहेत. मतदान केंद्रांच्या 100 मीटर परीघात (मतदान केंद्र परिसर) आणि मतदान केंद्राच्या आत मोबाईल फोन इत्यादी बाळगू नये. नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी केले आहे. याबाबतचे आदेश 20 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. याशिवाय मतदान केंद्र, परिसरात मतदार आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी वगळता इतर कोणीही व्यक्ती घुटमळणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

मतदानाची सर्व तयारी पूर्ण-"मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात आज सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्ग क्षीरसागर यांनी दिली. तसेच मतदारांनी त्यांना दिलेला मतदानाचा हक्क जरुर बजावावा," असे आवाहनही त्यांनी केले. मुंबईत 124 संवेदनशील केंद्र घोषित केले आहेत.

87 उमेदवार निवडणूक लढविणार-जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर म्हणाले की" मुंबई उपनगर जिल्ह्यात 7 हजार 353 एवढी मतदार केंद्र आहेत. मतदान यंत्रासह मतदान पथके रविवारी मतदान केंद्रावर रवाना होतील. चार लोकसभा मतदार संघ आहेत. 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम. 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी 26 एप्रिल ते 6 मे 2024 या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली. एकूण चार लोकसभा मतदारसंघात 87 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

अशी आहे मतदारांची संख्या-26- मुंबई उत्तरमध्ये 19, 27- मुंबई उत्तर पश्चिम 21, 28- मुंबई उत्तर पूर्वमध्ये 20, तर 29- मुंबई उत्तरमध्ये 27 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. उपगारातील चार लोकसभा मतदारसंघात 26 विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या 74 लाख 48 हजार 383 मतदार असून पुरुष मतदारांची संख्या 40 लाख 2 हजार 749, तर महिला मतदारांची संख्या 34 लाख 44 हजार 819 आहे. तृतीयपंथी मतदारांची संख्या 815 आहे. दिव्यांग मतदारांची संख्या 16 हजार 116, तर 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 98 हजार 263 आहे.चारही मतदार संघात मतदान केंद्राची ठिकाणे 10 83 तर असून मतदान केंद्रांची संख्या 7053 आहे. एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सावली, पाणी, एअर कुलर/पंखे, व्हीलचेअरसह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मतदान करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार -"4 जून रोजी नेस्को, गोरेगाव व उदयांचल शाळा, गोदरेज संकुल, विक्रोळी येथे मतमोजणी होणार आहे. चारही मतदारसंघात मतदानासाठी 40 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 22 हजार 44 मतदारांनी टपाली मतदानाच्या माध्यमातून हक्क बजावला आहे. तर दोन हजार 513 ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी घरातून मतदानाचा हक्क बजावला आहे. 54 लाख मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी दिली आहे.



मतदान केंद्रांपासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यावर बंदी- मतदानाची सर्व प्रक्रिया गोपनीय असल्यामुळे मतदान केंद्रावरील गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. मतदारांच्या गोपनीयतेसाठी मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यावर बंदी घालण्यात आली. मतदारांनीही मतदानासाठी येताना मोबाईल आणू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी केले आहे.

  • लोकशाही मूल्यं टिकवण्यासाठी सध्या होत असलेली 2024 ची लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. खालावलेल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमध्ये जनहिताच्या दृष्टीने सकारात्मक बदल घडून यावेत, या हेतूनं विचारवंतांनी मुंबईकर मतदारांना कळकळीचं आवाहन केलंय.


    काय आहे विचारवंतांचं म्हणणं -गेल्या दहा वर्षात सरकारनं अंमलात आणलेल्या चुकीच्या सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक धोरणांमुळे सामान्य भारतीयांचं जगणं बिकट झालं आहे. विरोधी आवाज पद्धतशीरपणे दाबून टाकला जात आहे. राजकारणाचा उघडउघड घोडेबाजार करण्यात आला. शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बहुमताच्या जोरावर बदलले जात आहेत. ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी आहे. मतदार म्हणून आपल्या हातात आणि आपल्या मतात आहे. त्यामुळे या मताधिकाराचा वापर करण्याची नितांत गरज आहे. सर्वधर्मीय नागरिकांच्या शांततामय सहजीवनावर विश्वास असणाऱ्या प्रत्येक मुंबईकर नागरिकाने धर्मांध शक्तींचा आणि धर्मांध वृत्तींचा विरोध करण्याची वेळ आलीय. केवळ काठावर न बसता नागरिकांच्या प्रश्नांवर कळकळीने काम करणाऱ्या, सर्व समाज घटकांप्रती समानतेचा भाव असणाऱ्या सरकारसाठी मतदान करणे ही सध्या काळाची गरज बनलीय. त्यामुळे मुंबईकरांनो घराबाहेर पडून निर्भयपणे मतदान करा, असे आवाहन या विचारवंतांनी केलंय.



आवाहन करणाऱ्या विचारवंतांमध्ये कोणाचा आहे समावेश ?माजी न्यायमूर्ती राजन कोचर, रामदास भटकळ, नीरजा, किशोर कदम, प्रेमानंद गज्वी, शफाअत खान, उर्मिला पवार, जयप्रकाश सावंत, सिसिलिया काव्हालो, सुनंदा भोसेकर डॉ. आशिष देशपांडे, अक्षय शिंपी, संकेत म्हात्रे, डॉ. विजय नाईक, दीपक राजाध्यक्ष प्रमोद निगुडकर, विजया चौहान, डॉ. मृदुल निळे, संदीप मेहता, उषा मेहता, जयवंत पाटील, जतीन देसाई, श्रीनिवास नार्वेकर, प्रा. रवी देवगडकर, आशिर्वाद मराठे, सॅबी परेरा, संजीवनी खेर, गिरीश सामंत, सुषमा देशपांडे, सुनील वालावलकर, प्रा. लीना केदारे आणि महेंद्र तेरेदेसाई आदींनी मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन केलय.


नाहीतर मुंबई इंडियन्ससारखी अवस्था होईल- सध्या देशात आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. मुंबईकरांची आवडती टीम म्हणजे मुंबई इंडियन्स आहे. मात्र यावर्षी मुंबई इंडियन्स या संघाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्स टीमचे साखळी फेरीतच आव्हान गारद झाले आहे. यावर्षी मुंबई इंडियन्स या संघाच कर्णधार बदलण्यात आला. रोहित शर्मा यांच्या ठिकाणी हार्दिक पांड्या याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. या निर्णयावर अनेक क्रिकेटप्रेमींनी तसेच क्रिकेट समीक्षकांनी विरोध केला होता. मुंबई इंडियन टीमचा कर्णधार बदलला. त्यामुळे संघाला समाधानकारक कामगिरी बजावता आलेली नाही. त्याचप्रमाणे देशाचा जो कर्णधार आहे (म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी) तोच कायम राहू दे... जर त्याला बदलले तर मुंबई इंडियन टीमसारखे देशाची अवस्था होईल, असा संदेश देणारे बॅनर दादरमध्ये लावण्यात आले आहेत.

हेही वाचा-

  1. उमेदवारांची शेवटच्या दिवशी प्रचारघाई... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं योग्य मतदान करण्याचं आवाहन - Lok Sabha Election 2024
  2. मोदी गुजरात-गुजरात करत आहेत, तुम्ही मुंबईला भिकारी केलंत; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका - Lok Sabha Election
  3. भाजपा महाराष्ट्राचा द्वेष करतो, शिवसैनिकांनी त्यांची मस्ती जिरवावी - उद्धव ठाकरे - lok sabha election
Last Updated : May 20, 2024, 6:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details