मुंबई Mumbai High Court Hearing : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं कारागृह अधिकाऱ्यांचा फर्लोह नाकारण्याचा निर्णय रद्द केला. हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या तबरेज खानला या आरोपीला फर्लोह मंजूर केलाय. स्थानिक पोलीस स्थानकाच्या प्रतिकूल अहवालामुळं फर्लोह नाकारण्याच्या कारागृह प्रशासनाच्या निर्णयाविरोधात खानतर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना खंडपीठानं हा निर्णय दिलाय.
सुनावणी दरम्यान काय घडलं? : ऑगस्ट 2022 मध्ये राज्याच्या कारागृह प्रशासनानं एक परिपत्रक काढलं होतं. त्यामध्ये, गुन्ह्यातील शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना फर्लोह किंवा पॅरोलवर सोडण्यासाठी केवळ स्थानिक पोलिसांच्या अहवालावर विसंबून राहू नये, अशी सूचना कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांना करण्यात आली होती. याकडं खंडपीठानं सुनावणीवेळी लक्ष वेधलं. तसंच कारागृह प्रशासनानं जारी केलेल्या या स्वतःच्या विभागाच्या सूचनांची अंमलबजावणी कारागृह विभागाच्या महानिरीक्षकांकडून केली जाईल, अशी आशा आणि विश्वास असल्याची टिप्पणीही मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं यावेळी केली.
कारागृह व्यवस्थेत दोषी व्यक्तीला त्याचे कौटुंबिक संबंध टिकवण्यासाठी आणि त्याच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडता यावात, यासाठी पॅरोल आणि फर्लोहच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कारावासाची शिक्षा भोगणारा दोषी या लाभांचा हक्कदार असतो, असं खंडपीठानं यावेळी स्पष्ट केलं. मात्र, कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोषी व्यक्तींची पॅरोल आणि फर्लोहवर सुटका करण्याऐवजी नाकारल्यानं अप्रिय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडं खंडपीठानं लक्ष वेधलं. अशा परिस्थितीची काळजी घेण्यासाठी कायदे अपुरे असल्याचं आम्हाला वाटत नाही, असं खंडपीठानं म्हटलंय.