मुंबई : जोगेश्वरी जवळील ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली. फर्निचरचं गोदाम असल्यानं ही आग झपाट्यानं पसरली आणि काही वेळातच आगीनं भीषण रूप घेतलं. या ठिकाणी सध्या अग्निशमन विभागाचे जवान दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण आणण्याचं शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग सकाळी साडे अकराच्या सुमारास लागल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न :अग्निशमन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "जोगेश्वरी पश्चिम इथल्या रिलीफ रोडवरील गवत संकुलात सकाळी साडे अकराच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच पाण्याच्या बंबांसह अग्निशमन विभागाच्या जवानांची टीम घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी दाखल होताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी सध्या अग्निशमन विभागासह अदानी टॉवरचं कर्मचारी, 108 अॅम्बुलन्स आणि पोलीस तैनात आहेत."
मुंबईत फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग (Source- ETV Bharat) आकाशात धुराचे काळे लोट : ओशिवरा इथं फर्निचरची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळं एका फर्निचरच्या दुकानाला आग लागल्यानं आजूबाजूची इतर दुकानंही आगीच्या भक्षस्थानी येण्याची शंका अधिकाऱ्यांनी उपस्थित केली. सध्या आगीची तीव्रता वाढत असून आगीचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूचा परिसर सुरक्षित करण्याचं काम सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आगेची तीव्रता अधिक असल्यानं आणि लाकूड गोदामाला आग लागली असल्यानं धुराचे काळे लोट आकाशात दिसत आहेत. त्यामुळं परिसरात भीतीचं वातावरण आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश :घटनास्थळी सध्या 12 फायर इंजिन, सहा मोठे टँकर, रुग्णवाहिका आणि वरिष्ठ अग्निशमन अधिकारी उपस्थित आहेत. अधिकाऱ्यांनी ही आग आजूबाजूच्या साधारण दीडशे गाळ्यांमध्ये पसरल्याची शक्यता उपस्थित केली आहे. स्थानिक रहिवाशांकडून सिलेंडरच्या स्फोटामुळं आग लागल्याचं सांगितलं असलं तरी, अग्निशमन विभागाकडून आगीचं अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही. या संदर्भात मुंबई अग्निशमन विभागाचे प्रमुख अंबुलगेकर यांनी सांगितलं की, "आमच्या जवानांना आगेवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून, ही लेवल दोनची आग होती. या आगीचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू असून त्याचा तपास सुरू आहे. तसंच या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. सोबतच या दुर्घटनेत कोणीही जखमी नाही."
हेही वाचा :
- कार विहिरीत कोसळल्यामुळे 3 तरुणांचा बुडून मृत्यू, दोन सख्ख्या भावांचा समावेश
- आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात; विद्यार्थ्यांचे औक्षण करून साखर वाटून स्वागत
- साई संस्थान कर्मचारी हत्या प्रकरण; अन् 'त्या' फ्लेक्स बोर्डवर वडिलांचा फोटो पाहून चिमुकली ढसाढसा रडली