मुंबई BMC Budget 2024 :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी (1 फेब्रुवारी) देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आज (2 फेब्रुवारी) देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहराचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वर्ष 2024-25 चा हा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सादर केलाय. यावर्षी देखील महानगरपालिकेचा अर्थसंकल्प नगरसेवकांच्या अनुपस्थितीत सादर झालाय. मागील दोन वर्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नसल्यानं, यावर्षीदेखील आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्प सादर केलाय.
60 हजार कोटींचा अर्थसंकल्प : 'बीएमसी'नं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 59,954.75 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. 2023-24 चा अर्थसंकल्प हा 54,256.07 कोटी रुपये इतका होता. त्यामुळं मागील वर्षापेक्षा जवळपास 10.50% वाढ या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
वर्ष 2024-25 वर्षासाठी अर्थसंकल्प : मुंबई पालिकेच्या सहआयुक्त आणि प्रशासक अश्विनी भिडे यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडं सादर केलाय. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त पी. वेलरसू यांनी एकूण अर्थसंकल्पीय अंदाज आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे सादर केलाय. जवळपास 60 हजार कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय.
नगरसेवकांच्या अनुपस्थितीत सलग दुसऱ्यांदा अर्थसंकल्प : पालिकेतील निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत सात मार्च 2022 रोजी संपली. त्यानंतर पालिकेत प्रशासकीय कारभाराला सुरुवात झाली. मागील दीड वर्ष इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचा प्रशासकीय कारभार सुरू आहे. आगामी लोकसभा, विधानसभा तसंच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष होतं.