नवी मुंबई Morbe Dam Overflows : स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर स्वत:च्या मालकीचं धरण असणारी नवी मुंबई ही एकमेव महानगरपालिका असून मोरबे धरणामुळे नवी मुंबई ही जलसमृध्द महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर खालापूर तालुक्यात असलेलं 450 दललि प्रतिदिन क्षमतेचं मोरबे धरण पूर्ण भरलं असून शुक्रवारी आमदार गणेश नाईक आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते मोरबे धरण प्रकल्पस्थळी पारंपरिक पद्धतीनं जलपूजन करण्यात आलं. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. तसेच माजी महापौर जयवंत सुतार आणि सुधाकर सोनवणे, माजी नगरसेवक विनोद म्हात्रे उपस्थित होते.
मुंबईनंतर नवी मुंबई ही स्वमालकीचं धरण असणारी एकमेव महानगरपालिका :मुंबईनंतर नवी मुंबई ही स्वत:च्या मालकीचं धरण असणारी एकमेव महानगरपालिका आहे. हा दूरदृष्टीचा निर्णय असल्याचं मत व्यक्त करत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याच्या इतर जलस्त्रोतांचा शोध घेण्याची आवश्यकता आहे, असं यावेळी सांगितलं. नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ कैलास शिंदे यांनी मोरबे धरण यावर्षी ऑगस्ट महिन्यातच पूर्ण भरले असून ही आपल्या नवी मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे. ही निसर्गाची कृपा असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. नवी मुंबईकरांना स्वच्छ, शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीनं समन्यायी जलवितरण व्यवस्था करण्यात येत आहे. भविष्यात लोकसंख्येची वाढ लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.