मुंबई Molestation : बदलापूर मधील शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं बदलापुरात काल जनसामान्यांचा रोष पाहायला मिळाला. आज देखील या घटनेमुळे बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. त्यातच मुंबईत चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. नागपाडा परिसरात ८ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानं खळबळ उडाली आहे.
कानातले डुल विविध प्रकारची कर्णफुलं विकणाऱ्या एकानं आठ वर्षीय चिमुकलीचं लैंगिक शोषण केलं. या चिमुरडीला कानातले दाखवण्याच्या नावाखाली तिचं लैंगिक शोषण केलं. या प्रकरणी पोलिसांनी लगेच कारवाई केलीय. कानातले टॉप्स विक्री करणाऱ्या झुबेर शाहला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. शेजारी उभ्या असलेल्या महिलेनं नराधमाचं कृत्य बघून आरडाओरडा केला आणि पळून जात असताना झुबेर शाह याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं. याप्रकरणी विनयभंग आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांनी दिली आहे.