पुणे Raj Thackeray Visit Pune : पुणे शहरात तसेच घाट माथ्यावर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून खडकवासला धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. मागील आठवड्यात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीनं पुणे शहरातील अनेक भागात नागरिकांचं मोठं नुकसान झालं. सिंहगड रोड इथल्या एकता नगर परिसरात देखील पाणी साचल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं. आज देखील पुणे शहरात हवामान विभागानं रेड अलर्ट दिला असून सकाळपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे एकता नगर परिसरात पुन्हा एकदा पाणी साचल्याचं दिसून आलं आहे. मुसळधार पावसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात धाव घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
पाणी साचलेल्या एकता नगरात राज ठाकरेंनी केली पाहणी :आज पुण्यातील सिंहगड रोड इथल्या एकता नगर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, "मी काही दिवसांपूर्वी इथं येऊन गेलो आणि मार्ग काढू असं सांगितलं होतं. शनिवारी माझी मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली. यात मुळामुठा कॉरिडॉर संदर्भात चर्चा झाली. तसेच रिडेव्हलपमेंट बाबत देखील चर्चा झाली. मागच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे वाहनं पाण्याखाली गेली. यात ज्या कंपन्या इन्शुरन्स देत नाहीत, त्या संदर्भात महापालिका आयुक्त यांना सांगितलं आहे. लवकरात लवकर इन्शुरन्स भरून घ्या, तसंच संरक्षक भिंती बांधून घेण्याबाबत सुद्धा चर्चा झाली आहे. डेक्कन इथं विजेचा शॉक लागून 2 मुलं दगावली. त्यांना 10, 10 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी त्यांच्या कुटुंबाला ते देतील. तसेच त्यांच्या भावाला सरकारी नोकरी लावण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. रिवर फ्रंटचे जे काम चालू आहे ते काम थांबवण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.