मुंबई Raj Thackeray News :केंद्र सरकारने माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एमएस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर तीन पोस्ट शेअर करत या तीनही नेत्यांच्या नावांची घोषणा केली. मोदींच्या या घोषणेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देखील मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावं अशी मागणी केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे : भाजपा प्रणित केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत नेते प्रणव मुखर्जी यांना देखील मरणोत्तर भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. याचाच आधार घेत राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना देखील मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट लिहिली असून त्यात राज ठाकरे म्हणतात की, "माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एम. एस. स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो..."
राज ठाकरे पुढे म्हणाले की, "बाकी पी. व्ही. नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंह ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणव मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे. तर, मग हेच औदार्य त्यांनी बाळासाहेबांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल." अशी मागणी बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.