अमरावती Ravi Rana On Navneet Rana :नवनीत राणायांच्या पराभवाचं दुःख आम्हाला आहे. त्यांच्या पराभवासाठी ज्या दगाबाजांनी दगा दिला त्यांना मात्र येत्या काळात निश्चित धडा शिकवू, असा इशारा बडनेराचे आमदार रवी राणा यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या पराभवानंतर पहिल्यांदाच आमदार रवी राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकारांची संवाद साधला. यावेळी नवनीत राणा यांच्या पराभवाची जबाबदारी ही पूर्णतः माझीच असल्याची कबुली देखील आमदार रवी राणा यांनी दिली.
प्रामाणिक प्रयत्नांमुळे काँग्रेसचा विजय :अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासह सुनील देशमुख, बबलू देशमुख या नेत्यांनी आणि काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाची इमान राखत प्रामाणिकपणे आपल्या पक्षाचे काम केले. त्यामुळे अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे हे निवडून आलेत. बळवंत वानखडे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांना कुठलीही अडचण असली तरी मी आणि नवनीत राणा त्यांना मदत करण्यास सोबत आहोत. काँग्रेसच्या मंडळींप्रमाणे आमच्या सोबत असणाऱ्यांची भूमिका प्रामाणिक नव्हती याबाबत देखील आमदार रवी राणा यांनी खंत व्यक्त केली.
2019 च्या विजयात मुस्लिम आणि आंबेडकरी जनतेचा सिंहाचा वाटा :2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विजयात मुस्लिम आणि आंबेडकरी जनतेचा सिंहाचा वाटा होता. मी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गुरू मानतो. मी देखील बाबासाहेबांचा अनुयायी आहे. असं असताना विरोधकांनी देशाचं संविधान धोक्यात आहे ते बदललं जाणार अशा प्रकारची चुकीची अफवा पसरविल्यामुळे आंबेडकरी समाज आमच्यापासून यावेळी दुरावला. मुस्लिमांमध्ये देखील अपप्रचार करण्यात आल्यामुळे आमच्या कायम सोबत असणारे हे दोन्ही समाज या निवडणुकीत दुरावल्याचे दुःख देखील आमदार रवी राणा यांनी प्रकट केलं.
अमरावतीचा आमदार आता मुस्लिम असेल :अमरावती विधानसभा मतदारसंघात मुस्लिम बांधवांनी मोठ्या ताकदीने मतदान केले. आता आमच्या पक्षाचाच उमेदवार निवडणूक रिंगणात असावा असा सूर मुस्लिम समाजामध्ये उमटतो आहे. मुस्लिमांच्या वतीने काँग्रेस पक्षाकडे मोठ्या ताकदीने उमेदवारी मागितली जात आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघातील मुस्लिमांची संख्या पाहता आता विधानसभा निवडणुकीत अमरावती विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा मुस्लिम समाजाचा होऊ शकतो असं मला वाटत असल्याचं आमदार रवी राणा म्हणाले.
बच्चू कडू हे मांडवलीबाज :अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे स्वतःला जसे दाखवतात वास्तवात त्यांचा चेहरा दिसतो तसा नाही. केवळ मांडवल्या करणे हाच त्यांचा कायम उद्योग राहिला आहे. आता लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांनी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला. बच्चू कडू आणि त्यांच्या उमेदवाराने उमेदवारी मागे घेण्यासाठी माझ्यासोबत मांडवली करण्याचा प्रयत्न केला. बच्चू कडू यांना माझ्याकडून किती रक्कम हवी होती याबाबत मी लवकरच पुराव्यासह जाहीर करेल. बच्चू कडू यांच्या अशा वागण्याचा अचलपूर मतदारसंघातील सुज्ञ जनता विधानसभा निवडणुकीत निश्चितच विचार करून त्यांना धडा शिकवेल असे देखील आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे. बच्चू कडू यांच्या कृत्याचा पर्दाफाश मी लवकरच करणार असे देखील आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.