सातारा - रेड कुणी टाकायला लावली का? हे मला माहिती नाही. पण, कुणीतरी टाकायला लावली, असं लोकांना वाटतंय. आपल्या तालुक्यात कुणावरच अशी रेड झाली नव्हती. ती संजीवराजेंवर झाली. माझ्यावरच रेड टाकली असती तर माझा स्टेटस तरी वाढला असता, असा उपरोधिक टोला आमदार रामराजे नाईक-निंबाळकरांनी आपल्या विरोधकांना लगावला.
तेच खरे कार्यकर्ते : फलटण तालुक्यातील आंदरुड गावात कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या हुरडा पार्टीत ते बोलत होते. रामराजे पुढं म्हणाले की, "सत्ता नसताना जे कार्यकर्ते टिकतात, तेच खरे कार्यकर्ते असतात. आपल्याकडं सत्ता उपभोगून काही कार्यकर्ते आता तिकडं गेले आहेत. त्यांनी त्यांची दिशा पकडलेली आहे. तुम्ही आता त्यांच नाव न काढता आपली दिशा पकडा."
फलटणमध्ये मी संस्कृती आणली :"फलटण तालुक्याच्या राजकारणात १९९१ पूर्वी सर्वसामान्यांपेक्षा सत्ता ही केंद्रबिंदू मानली जात होती. सत्ता मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये आणि गावागावात भांडण लावण्याचे प्रकार सुरु होते. नातं विसरुन एकमेकांच्या भावकीतील लग्नाला लोक जात नव्हते. ही परिस्थिती थांबवण्यासाठी आपण राजकारणात आलो. तालुक्यात विकास केला, संस्कृती आणि शांतता आणली," असंही आमदार रामराजेंनी सांगितलं.