मुंबई Miss world 2024 Krystyna Pyszkova : झेक प्रजासत्ताक देशाच्या क्रिस्टिना पिस्कोव्हा हिनं मिस वर्ल्ड 2024 चा मुकूट पटकावला. मुंबईतील जिओ कन्वेंशन सेंटरमध्ये पार पडलेल्या रंगारंग कार्यक्रमात मिस वर्ल्ड 2024 चा सोहळा शनिवारी रात्री पार पडला. यावेळी बोलताना मिस वर्ल्ड 2024 चा मुकूट पटकावलेल्या क्रिस्टिना पिस्कोव्हा हिनं कृतज्ञता व्यक्त केली. "मिस वर्ल्ड 2024 चा 'मुकूट' मिळाल्यानं मी खूप उत्साही आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी यासाठी काम करत आहे. मिस वर्ल्ड 2024 चा मुकूट पटकावल्यानं मी आता जास्तीत जास्त मुलांना मदतीचं काम करू शकेल," असं तिनं यावेळी स्पष्ट केलं.
क्रिस्टिना पिस्कोव्हा मिस वर्ल्ड 2024 :मिस वर्ल्ड 2024 ची स्पर्धा मुंबईत शनिवारी रात्री आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंचावर 12 ज्युरींनी स्पर्धेत सहभागी झालेल्यांचं परिक्षण केलं. यात बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, मिस वर्ल्ड संघटनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युलिया एव्हलन मॉर्ले, समाजसेविका अमृता फडणवीस, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला, पत्रकार रजत शर्मा, विनीत जैन, मिस वर्ल्ड इंडियाचे चेयरमन जामिल सैदी आदींसह माजी तीन मिस वर्ल्ड यांचा समावेश होता. यावेळी परिक्षकांनी झेक प्रजासत्ताक देशाच्या क्रिस्टिना पिस्कोव्हा हिला मिस वर्ल्ड 2024 घोषित केलं. त्यावेळी मंचावर एकच जल्लोष साजरा करण्यात आला.