बीड Minor Girl Rape Case Beed : माजलगावमध्ये धक्कादायक घटना घडली. येथे 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी 15 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपी मोकाट आहेत. तसेच आरोपीकडून पीडितेच्या कुटुंबाला केस परत घ्या, अन्यथा ठार मारू अशी धमकीही दिली. त्यामुळे आरोपी मोकाट असल्यानं मुलीचं शिक्षण बंद करण्याची वेळ कुटुंबावर आली. आता पीडितेच्या आईने थेट मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली. त्यामुळे लाडकी बहीण योजना राबविणारे सरकार आता मुलीला सुरक्षा आणि न्याय देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पीडितेला गाडीवर बसवून लॉजवर नेलं : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत 6 जून रोजी नववीत शिकणारी पीडित विद्यार्थिनी रस्त्याने जात होती. त्यावेळी आरोपीने तिली गाडीवर बसवून माजलगाव शहरातील लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितलं तर जीवे मारेन अशी धमकी दिली. या धमकीमुळे पीडित मुलीने याबाबत कुणालाच काहीच सांगितलं नाही.
पीडितेने आईला सांगितला घडलेला प्रकार : पीडित मुलीने शाळा सुरू झाल्यावर शाळेत जायला नकार दिला. यावेळी आईने कारण विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तिने म्हटले की, '4-5 मुलांनी मला गाडीवर बळजबरीने बसवून लॉजवर नेऊन अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मला शाळेत जायला भीती वाटत होती. माझ्यावर एकाने अत्याचार केला पण लॉजवर साथ देणारे तिघेजण होते. सर्वजण एकाच रूममध्ये होते."