नवी मुंबई :अल्पवयीन तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत अनेक वर्ष प्रेमसंबंध ठेवल्यानंतर भावकीतील असल्यानं तरुणानं दुसरीकडं लग्न करत असल्याचं सांगितलं. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या अल्पवयीन तरुणीनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली. ही घटना नवी मुंबई परिसरातील पनवेल तालुक्यातील मोरबे परिसरातील गावात घडली. याप्रकरणी मृत तरुणीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
भावकीमधील चुलत भावाशी होते प्रेमसंबंध : मृत अल्पवयीन तरुणी आपल्या कुटुंबासह नवी मुंबई जवळील पनवेल तालुक्यातील एका गावात राहत होती. तिचे भावकीतीलच नात्यानं चुलत भाऊ लागणाऱ्या 21 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र तुमच्या दोघांचं नातं बहीण भावाचं आहे, असं कुटुंबीयांनी त्यांना अनेकदा समजावून सांगितलं. तरीही अल्पवयीन तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. प्रियकरासोबत लग्न करण्यावर ती ठाम होती. परंतु 29 नोव्हेंबरला तिचा प्रियकर दुसऱ्याच एका मुलीला घरी घेउन आला आणि तिच्यासोबत लग्न करणार असल्याचं त्यानं सांगितलं. यातून अल्पवयीन तरुणी प्रचंड निराश झाली. या तरुणीला मानसिक धक्का बसल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. ती घरात कोणाशीही बोलत नव्हती असं तिच्या नातेवाईकांनी सांगितलं.